ठाणे : बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीची धडक जनावराला बसली. या धडकेत म्हैस हे जनावर रेल्वे रुळावर अडकले. यामुळे कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल गाडी अर्धा ते पाऊण तास एका जागीच थांबण्यात आली होती. हे जनावर काढण्याचे पर्यंत रेल्वे प्रशासनाच्या वतीने सुरू असून काही काळ लोकल सेवा ठप्प झाली आहे.
लोकल गाडी ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी लोकल गाडीतून कामानिमित्त मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. गेल्या काही वर्षांमध्ये कर्जत, बदलापूर या परिसरातील लोकवस्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. येथील बहुतेक प्रवासी मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे नोकरीकरिता येत असतात. इतर मार्गाने प्रवास करणे अधिक खर्चिक असल्याने हे प्रवासी रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देतात. सकाळी आणि सायंकाळच्यावेळी या कर्जतला जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. कर्जत, भिवपुरी, नेरळ, वांगणी, शेलू येथून अनेकजण दररोज प्रवास करत असतात. रखडलेले वेळापत्रक, लोकल गाड्यांचा अभाव, आणि लोकल गाडीतील गर्दी यामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागत असतो.
अशातच बुधवारी सकाळी १० वाजून ४३ मिनिटांनी कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल गाडी निघते. ही लोकल गाडी ११ वाजून ७ मिनिटांनी वांगणी स्थानकातून रवाना झाली. लोकल गाडी वांगणी बदलापूर दरम्यान आली असता गाडी समोर म्हैस हे जनावर आले. हे जनावर रेल्वे रुळावर अडकले. जनावर अडकले असल्याने लोकल गाडी पुढे जाण्यास असमर्थ होती. या जनावरास रेल्वे रुळावरून बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. ही लोकल गाडी १ तासाहून अधिक काळ एकाच जागी थांबली असल्याने कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.
प्रवाशांमध्ये संभ्रम
रेल्वे गाडी वांगणी बदलापूर दरम्यान अचानक थांबवण्यात आली ५ ते १० मिनिट उलटूनही गाडी निघत नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच अनेक प्रवासी काय घडले हे पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उतरल्याचे चित्र होते.
