बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळू धरणाच्या उभारणीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ३३६ कोटींचा निधी देऊ केला आहे. मात्र ज्या ठिकाणी हे धरण होणार आहे. तेथील ग्रामस्थांनी पुन्हा धरण विरोधाचे शस्त्र उपसले आहे. नुकतीच येथील खुटल ग्रामपंचायतीतील वाकलवाडीत ग्रामस्थांनी सभेचे आयोजन केले होते. येत्या काही दिवसात बुडीत क्षेत्रातील सर्वच ग्रामपंचायती धरणविरोधाचे ठराव करणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी नव्या जलस्त्रोतांची उभारणी करण्याची गरज आहे. गेल्या महिन्यात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी १६ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत काळू धरण वेगाने मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून काळू धरणाच्या भूसंपादनासाठी ३३६ कोटींच्या निधीलाही मंजूर दिली. या काळू धरणातून १ हजार १४० दशलक्ष घनमीटर इतके पाणी उपलब्ध होण्याची आशा आहे. या धरणासाठी मुरबाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीमधील १८ गावे आणि २३ पाड्यांची जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. तर वन विभागाची सुमारे ९९९ हेक्टर जमीनही धरणासाठी आवश्यक आहे. या भूसंपादन आणि एकंदरीत काळू धरणाला स्थानिकांचा विरोध आहे. या विरोधाला व्यक्त करण्यासाठी नुकतीच खुटल ग्रामपंचायतीच्या वाकलवाडीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्यने बुडीत क्षेत्रातील गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. श्रमिक मुक्त संघटनेच्या माध्यमातून ही सभा आयोजित करण्यात आली होती. धरणाला विरोध करण्याचा ठराव या सभेत करण्यात आला. यापूर्वीच्या कोयना, बारवी, पिंपळगाव आणि जोगा धरणाच्या विस्थापितांचे अजूनही योग्य पुनर्वसन झाले नाही. त्याचवेळी जागतिक तापमान वाढ आणि बदलते हवामान या परिस्थितीत ९९९ हेक्टर जंगल आणि १२०० हेक्टर शेतजमीन बुडवणे व्यवहार्य आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे जलसंधारणाचे इतर सोपे आणि कमी खर्चीक पर्यायांची चाचपणी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Locals re aggressive dam opposition will be resolved statement president ysh
First published on: 09-08-2022 at 14:55 IST