ठाणे : लोकमान्यनगर-शास्त्रीनगर क्लस्टर योजना, विकास आराखड्यातील रस्ता आणि अंतर्गत मेट्रो मार्गिकेवरून शिवसेनेच्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जाहीर सभा तसेच समाजमाध्यमांद्वारे वेगवेगळ्या भुमिका मांडल्या जात आहेत. या दोन्ही गटातील मतमतांतरामुळे नागरिकांमध्ये सभ्रमांचे वातावरण असल्यामुळे ते दूर करण्यासाठी शिवसेनेच्या एका गटाने आता घरोघरी जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधण्याची रणनिती आखली आहे.

लोकमान्यनगर-शास्त्रीनगरमधील क्लस्टर योजना राबविली जाणार आहे. या योजनेचा एक भाग म्हणून विकास आराखड्यातील रस्ता विकसित केला जाणार असून येथूनच अंतर्गत मेट्रो मार्गिका प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु याविरोधात काही दिवसांपुर्वी लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे उपस्थित होते. विकासाला विरोध नसल्याचे सांगत नागरिकांचे विस्थापन आणि विनाश मान्य नसल्याची भूमिका मांडली होती. रस्ते मोठे असावेत म्हणून ते रुंद करण्यात काहींना रस नसून त्यांचा विषय वेगळा आहे. त्यांना क्लस्टरमध्ये रस आहे, असा आरोप त्यांनी केला होता. क्लस्टर योजना राबविण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सभागृह नेते हणमंत जगदाळे हे आग्रही आहेत. त्यामुळे सरनाईकांनी क्लस्टर योजनेवरून जगदाळे यांना लक्ष्य केल्याची चर्चा रंगली होती. तसेच या योजनेतून बेघर केले जाणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्येही भितीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर जगदाळे यांनी घेतलेल्या निर्धार मेळाव्यात क्लस्टरबाबतची भूमिका स्पष्ट केली. यानिमित्ताने क्लस्टर योजनेवरून शिवसेनेतील दोन गट पडल्याचे समोर आले होते.

जाहीर सभा आणि बैठकांमधून दोन्ही गट आपआपली भुमिका मांडत असतानाच आता त्यांचे कार्यकर्ते समाजमाध्यमांवर सक्रीय झाले आहेत. एक गट योजनेबाबत काही प्रश्न उपस्थित करत आहे तर, दुसरा गट योजना नागरि हिताची कशी आहे, हे सांगत आहे. त्यामुळे क्लस्टरचा वाद समाजमाध्यमांवर पोहचला असतानाच, जगदाळे यांनी आता घरोघरी जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधण्याची रणनिती आखली आहे. परिसरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमधील ५०० कार्यकर्त्यांचे एक दिवसीय शिबीर घेऊन त्यांना क्लस्टर योजनेबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर हे कार्यकर्ते पुढील काही दिवस घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांची मते, सूचना आणि आक्षेप जाणून घेणार आहेत. या संवादातून क्लस्टरबाबतचे गैरसमज दूर करण्याबरोबरच नागरिकांची भूमिका जाणून घेतली जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या निर्धार सभेत जगदाळे यांनी तशी घोषणाही केली होती. त्यामुळे निर्धार मेळाव्यानंतर आता ‘घराघरात संवाद’ हा क्लस्टरच्या राजकीय चर्चेचा पुढचा टप्पा ठरणार आहे.