डोंबिवलीतील व्यावसायिकांचे मलेशियात अपहरण

ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे वैद्य कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

डोंबिवलीतील दोन व्यावसायिकांचे मलेशियातील क्वालालांपूर येथून अनोळखी व्यक्तिंनी गुरुवारी रात्री एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी या व्यावसायिक बंधूंना अपहरणकर्त्यांनी दिली आहे. या प्रकरणाची तक्रार भारतीय राजदूताकडून मलेशिया सरकार आणि ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे वैद्य कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

रोहन प्रकाश वैद्य (३६), कौस्तुभ प्रकाश वैद्य (३१) अशी अपहरण झालेल्या व्यावसायिकांची नावे आहेत. ते डोंबिवली पूर्वेतील शिवम रुग्णालयामागील सेंट्रल रेल्वे को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत  राहतात. या अपहरणाची तक्रार अपहृत मुलांचे काका राजीव वैद्य (५९) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. कौस्तुभ व रोहन हे रॉक फ्रोझन फूड नावाने ‘फ्रोझन फिश’ विक्रीच्या व्यवसायात मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड देशात मध्यस्थ म्हणून काम करतात. या व्यवसायासाठी ते नियमित परदेशात ये-जा करतात. २ ऑगस्ट रोजी ते मलेशियातील ‘मीस ली फ्रोझन फूड’ कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर व्यावसायिक चर्चा करण्यासाठी गेले आहेत. त्यांचे वास्तव्य तेथील ग्रॅन्ट आर्चेड हॉटेलवर होते. ते डोंबिवलीतील कुटुंबीयांच्या संपर्कात होते. संध्याकाळी सहा वाजताची कंपनीबरोबरची बैठक झाली. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता घाबऱ्या आवाजात कौस्तुभ, रोहन यांनी डोंबिवलीत वडिलांना संपर्क करून, ‘आमचे अपहरण झाले आहे. एक कोटी रुपये अपहरणकर्ते मागतात,’ असे सांगू लागले. ३ ऑगस्ट रोजी अपहरणकर्त्यांनी प्रकाश वैद्य यांना ११ वेळा संपर्क करून खंडणीची मागणी केली. सून सायली कौस्तुभ वैद्य यांनी ही माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांना दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta crime news