scorecardresearch

ठाण्यात प्राथमिक फेरी उत्साहात

दुसऱ्या टप्प्यातील एकांकिका आज

ठाण्यात प्राथमिक फेरी उत्साहात
(संग्रहित छायाचित्र)

उत्कृष्ट कथेला संवादकौशल्य आणि उत्तम अभिनयाची जोड देत सर्वोत्तम सादरीकरणासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली कलाकारांची धडपड आणि उत्साह असे चित्र ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ स्पर्धेतील ठाणे विभागीय फेरीच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. महाविद्यालयीन तरुणाईला कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवारी ठाण्यात उत्साहात झाली. याच फेरीचा दुसरा भाग रविवार, ८ डिसेंबरला होणार आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीच्या पहिल्या टप्प्यात भाईंदर येथील अभिनव महाविद्यालय, उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालय आणि कल्याण येथील बी.के.बिर्ला महाविद्यालय या महाविद्यालयांनी त्यांच्या एकांकिका सादर केल्या. एकांकिका स्पर्धेच्या या प्राथमिक फेरीत कमीत कमी साधनसामग्री वापरून महाविद्यालयीन कलाकारांनी त्यांचे नाटय़ाविष्कार सादर केले आणि आपल्यातील नाटय़जाणिवांचे दर्शन घडविले.

एका कलाकाराची कौटुंबिक-आर्थिक परिस्थिती खंगलेली असताना त्याच्या आयुष्यात त्याला आवडत्या कलेत मिळणारे यश यावर भाष्य करणारी ‘संधी’ ही एकांकिका अभिनव महाविद्यालयाने सादर केली. शहरात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपल्या गावचा इतिहास शोधून काढताना तरुणाची धडपड यावर आधारित ‘हित्यास भूगोल’ ही एकांकिका एसएसटी महाविद्यालयाने सादर केली. तर एकीकडे कृषिप्रधान भारत अशी भारताची ओळख असताना दुसरीकडे शेतकऱ्याच्या आयुष्याचे भीषण वास्तव, शेतकरी आत्महत्या या सामाजिक विषयावर आधारित ‘इडा-पीडा’ ही एकांकिका बी.के.बिर्ला महाविद्यालयाने सादर केली. या वेळी उपस्थित नाटय़ क्षेत्रातील परीक्षकांनी सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीचा दुसरा टप्पा रविवारी होणार आहे.

सोबत दिलेल्या सर्व प्रायोजकांसह ‘रणथंबोर सफारी’ आणि ‘ईशा नेत्रालय’हे या स्पर्धेचे ठाणे विभागासाठी प्रादेशिक प्रायोजक (रिजनल पार्टनर) आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या