ठाणे : विविध सामाजिक विषयांना उत्तम कथेची साथ आणि उत्कृष्ट अभिनयाच्या सादरिकरणासह ‘लोकसत्ता लोकांकिका’ ठाणे विभागीय अंतिम फेरी रविवारी येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात उत्साहात रंगली. ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘थिम्मक्का’ या एकांकिकाने पाच एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट एकांकिकाचा मान पटकावत महाअंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

शेतकऱ्याची व्यथा, पर्यावरण, पाकिटमार, रंगकर्मींचे आयुष्य, समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव यांसारख्या विषयांवर आधारित एकांकिका ठाणे विभागीय अंतिम फेरीत सादर करण्यात आल्या. त्यास प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. यामध्ये पनवेलच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या ‘कीचकवध पुन्हा’ या एकांकिकेने द्वितीय आणि बदलापूर येथील आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ‘बिटविन द डोअर्स’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. ठाणे विभागीय अंतिम फेरीचे परीक्षण लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते अजित भुरे आणि लेखक गणेश पंडित यांनी केले. परीक्षक गणेश पंडित, ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणा’चे संतोष तारे, ‘सॉफ्ट कॉर्नर’चे दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले.

अंतिम फेरीचा निकाल

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : साईराज घोलप (थिम्मक्का)

सर्वोत्कृष्ट लेखक : राजीव मुळ्ये (कीचकवध पुन्हा)

सर्वोत्कृष्ट अभिनय : अपर्णा घोगरे (थिम्मक्का)

सर्वोत्कृष्ट अभिनय : वेधान दारोळे (बिटविन द डोअर्स)

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार : सिद्धेश नांदलस्कर (थिम्मक्का)

सर्वोत्कृष्ट संगीत : सौरभ – सिद्धांत (थिम्मक्का)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : सिद्धेश नांदलस्कर (थिम्मक्का)

लोकसत्ता लोकांकिका या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेतून नवनवीन कलाकार घडतात. एकांकिका स्पर्धेनंतर परीक्षक रंगकर्मींशी संवाद साधत मार्गदर्शन करतात. यामुळे स्पर्धेचा दर्जा सुधारतो. या उपक्रमामार्फत तरुण कलाकारांनी नवनवीन विषय आणि केवळ एका ठेवणीतील जोखडामध्ये अडकण्यापेक्षा महत्त्वाचे वाटतात असे विषय मांडायला पाहिजेत. – अजित भुरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते

या उपक्रमातून नवनवीन विषय आजच्या तरुण पिढीला कळतात, आजूबाजूला सुरू असणाऱ्या गोष्टींचे त्यांना भान आहे हे त्यामुळे आम्हाला समजते. मी स्वत: अलीकडच्या काळापर्यंत एकांकिका करत असल्याने हे विषय अधिक जवळचे वाटतात. एवढी वर्षे व्यासपीठावर काम करत होतो आणि आज व्यासपीठासमोर बसून परीक्षण करणे हा माझ्यासाठी उत्तम अनुभव आहे. – गणेश पंडित, लेखक

‘थिम्मक्का’ ची सर्वच क्षेत्रात बाजी

मूल होत नसल्याने झाडांना मुलाप्रमाणे वाढवणाऱ्या सालुमरादा थिम्मक्का यांचा प्रेरणादायी प्रवास मांडणारी थिम्मक्का ही सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची एकांकिका उपस्थितांसह प्रेक्षकांचीही दाद मिळवून गेली. नेपथ्य, अभिनय, दिग्दर्शन, संगीत आणि प्रकाशयोजनेचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक या एकांकिकेने पटकावले. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने सलग चौथ्यांदा ठाणे विभागीय अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.