आज, उद्या समुपदेशक व तज्ज्ञांकडून करिअरविषयक मार्गदर्शन; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी
पुढच्या वर्षीसाठी एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी ‘नीट’ द्यावी लागणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे ‘नीट’ या सामायिक परीक्षेवरून सुरू झालेला गोंधळ संपला असला तरी या परीक्षेबद्दल निश्चित स्वरूपाची माहिती कित्येक विद्यार्थ्यांना नसते. ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात पहिल्यांदा ‘नीट’ परीक्षेची गुपिते विद्यार्थ्यांसमोर उलगडणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य ठरलेल्या या ‘नीट’ सामायिक परीक्षेच्या इत्थंभूत माहितीसह ताणमुक्त व्यक्तिमत्त्व विकासापासून ते विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींपर्यंतचा ‘यश’ मार्ग ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसमोर खुला होणार आहे.
ठाण्यात बुधवारपासून सुरू होणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात सलग दोन दिवस तज्ज्ञांकडून करिअरविषयक नवनव्या संधींविषयी माहिती करून देण्यात येणार आहे. ‘टिप टॉप प्लाझा’ येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतरच्या पहिल्याच सत्रात विद्यार्थ्यांंना ‘ताणमुक्त व्यक्तिमत्त्व विकास’ याविषयी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करणार आहेत. साठय़े महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल देशमुख सध्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी परवलीचा शब्द ठरलेल्या ‘नीट’बद्दल दोन दिवस विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात कला, वाणिज्य आणि ललित कला या क्षेत्रांतील नव्या करिअरविषयी अनुक्रमे दीपाली दिवेकर, चंद्रकांत मुंडे आणि जयवंत कुलकर्णी हे वक्ते दोन्ही दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
पहिल्या दिवसाचा समारोप श्रीकांत शिनगारे यांच्या ‘आरोग्यशास्त्र आणि तंत्रज्ञान’ या क्षेत्रातील नव्या संधींविषयीच्या सविस्तर विवेचनाने होईल.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता डॉ. आनंद नाडकर्णी उद्घाटन करणार असून पहिल्या सत्रात मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक हरीश शेट्टी यांचे अनोखे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यानंतर प्राध्यापक अनिल देशमुख यांचे ‘नीट’ व्याख्यान आणि विवेक वेलणकर ‘आरोग्यशास्त्र आणि तंत्रज्ञान’ क्षेत्रातील नवीन संधींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय ‘युक्ती’ तसेच पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन’, ‘अरेना अ‍ॅनिमेशन’, ‘पारुल युनिव्हर्सिटी’, ‘गणपत युनिव्हर्सिटी’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे ‘नॉलेज पार्टनर’ ‘आयटीएम’ हे आहेत.

मार्ग यशाचा
’ कुठे: टिपटॉप प्लाझा, ठाणे<br />’ कधी: २५ व २६ मे, सकाळी ९.३० पासून सायंकाळपर्यंत