उदंड उत्साहात लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषुस्पर्धेला प्रारंभ

महाविद्यालयीन तरुणांच्या विचारांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लोकसत्ता ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा शनिवारी ठाण्यात प्रारंभ झाला. नियोजित विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करत स्पर्धकांनी वक्तृत्त्व स्पर्धेचे व्यासपीठ आपल्या विचारांनी समृध्द केले आणि सामाजिक, साहित्यिक विषयांच्या चर्चेची नांदी झाली. प्रभावीपणे विषयाचे सादरीकरण करत स्पर्धकांनी वक्तृत्व  स्पर्धेचा पहिला दिवस आपल्या परखड विचारांनी गाजवला. ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेत शनिवारी सकाळपासून श्रोत्यांना स्पर्धकांच्या विचारमंथनाचा अनुभव घेता आला.

वीणा वर्ल्ड प्रस्तुत लोकसत्ता ‘वक्ता दशसहस्त्रेषु’,  पावर्ड बाय डॉ. मांजरेकर्स आयसीडी, बँक ऑफ महाराष्ट्र, दि. विश्वेश्वर सहकारी बँक लि. पुणे, एमआयटी, औरंगाबाद यांच्या सहकार्याने पार पडत आहे. या राज्यस्तरिय वक्तृत्त्व स्पर्धेची महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारी यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे पार पडणार आहे. ठाणे विभागाच्या प्राथमिक फेरीत ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यापैकी आठ स्पर्धकांची निवड ठाणे विभागाच्या अंतिम फेरीसाठी करण्यात आली. आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार आणि झुनझुनवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका लतिका भानुशाली यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. डोंबिवली, बदलापूर, उरण या ठिकाणाहून स्पर्धकांनी स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता.

साहित्य संमेलनातील हरवत चाललेली सुसूत्रता हे साहित्यसंमेलनाचे अपयश आहे. सरकारी अनुदान आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांच्या देणग्या यामुळे आदर्श साहित्य संमेलन निर्माण होईल. देशासमोर असणाऱ्या आव्हानांना स्वीकारत कृषीप्रधान संस्कृती जपण्याची उमेद असणे ही देशभक्ती आहे. जगण्यासाठी भौतिक खाद्याप्रमाणेच वैचारिक खाद्य देखील महत्त्वाचे आहे. समाजाने स्वैर वागण्याचे सैराटीकरण आटोक्यात आणले पाहिजे, अशा विविध मुद्यांना स्पर्श करत स्पर्धकांनी आपल्या विचारबोधातून स्पर्धेचे व्यासपीठ समृध्द केले.

परीक्षकांच्या मते..

विषयाचं आकलन करुन गर्भितार्थ मांडावा..

वक्त्याने आपले मत मांडताना श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले पाहिजे. एखाद्या विषयाची तर्कशुद्ध मांडणी करताना विषयाचे आकलन करुन त्यातील प्रत्येक शब्दाचा गर्भितार्थ जेव्हा आपण रसिकांना समाजावून देण्यात यशस्वी होतो तोच खरा वक्ता दशसहस्त्रेशु ठरतो. वक्तृत्व कला सादर करताना वाक्चातुर्य, देहबोली, शब्दफेक, वाक्याची वेळ याकडे लक्ष दिले पाहिजे. एवढेच नव्हे तर ज्याप्रमाणे लिहीताना आपण व्याकरणाचा विचार करतो, त्याचप्रमाणे भाषणातही व्याकरणाचा विचार करावा. तुमचा विचार केवळ पोहचत नाही तर श्रोत्यांच्या मनात मुरतो. त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्ही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले असे म्हणता येईल. शब्द लिहीणे आणि उच्चारण याकडे लक्ष दिले पाहिजे. वक्त्याने भाषण करताना विषयाची व्यापकता आणि परिणामकारताही साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.   डॉ. वैदही दप्तरदार, प्राचार्य आदर्श महाविद्यालय, बदलापूर

पाठांतराची आवश्यकता नाही..

लहान असताना आपण प्रकट वाचन करतो, शाळेत मुकवाचन, तर तरुणाई चिंतनशील वाचन करत. त्यामुळे वैचारिक संयमता विकसित होते. लोकसत्ता सारख्या दर्जेदार व्यासपीठावर जेव्हा आपण भाषण करण्यासाठी उभे राहतो तेव्हा निव्वळ पाठांतर करुन उपयोग नाही. एखादा विषयाची मांडणी करताना त्याला वास्तवाशी जोडणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे संतुलीत विचार सहजपणे श्रोत्यांपर्यंत पोहचण्यास मदत होते. एखाद्या विषय परखडपणे श्रोत्यांसमोर मांडण्यासाठी पाठांतराची गरज भासत नाही. त्यासाठी विषय आत्मसात करणे गरजेचे आहे. भाषण करताना अतिरंजीत अभिनयाची आवश्यकता नसते. तसेच आपण वापरलेले एखादे वाक्य किंवा ओळी कोणत्या लेखकाच्या आहेत हेदेखीले त्यावेळी नमुद करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक वाक्याला काहीतरी पाश्र्वभुमी आहे हे यावरुन दिसुन येते.   लतीक भानुशाली, प्राध्यापीका झुनझुनवाला महाविद्यालय

ठाणे विभागाच्या प्राथमिक फेरीचे विजेते

  • ’ प्रज्ञा पोवळे – जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे
  • ’ स्वानंद गांगल विद्या प्रसारक मंडळ लॉ कॉलेज, ठाणे
  • ’ विशाखा गढरी – ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे
  • ’ निकिता टेंभे – आदर्श महाविद्यालय, बदलापूर
  • ’ प्राची भगत – बार्न्‍स कॉलेज, पनवेल
  • ’ राहुल पवार – मोह महाविद्यालय, ठाणे
  • ’ सतीश घाटगे – एमजीएम इंजिनिअरिंग कॉलेज, कामोठे
  • ’ नम्रता चव्हाण – बिर्ला कॉलेज, कल्याण</li>