ठाणे : उष्म्याने ग्रासलेल्या वातावरणात स्वरांचे हलके तुषार जगण्याची असोशी वाढवतात. ठाण्यात २८ आणि २९ एप्रिल रोजी ‘लोकसत्ता’तर्फे त्याच हेतूने ‘स्वरोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी कान आणि मन शांत करणारे संगीत ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.

संगीताच्या या कार्यक्रमांमध्ये अभिजात आणि ललित संगीतातील नामवंत आपली कला सादर करणार आहेत. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात होणारे हे कार्यक्रम विनामूल्य असले, तरी रसिकांना उपस्थित राहण्यासाठी आधीच प्रवेशिका घ्यावी लागणार आहे.

गुरुवार, २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता भारतीय संगीतात मोलाची भर घालणाऱ्या विविध वाद्यांवर हिंदी आणि मराठी चित्रपटांतील लोकप्रिय गीतांचा ‘वाद्यरंग’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चित्रपट संगीतातील वाद्यमेळामध्ये वाद्यांचे महत्त्व अभूतपूर्व मानले जाते. कित्येक गीतांमध्ये एखादे विशिष्ट वाद्य आपली स्वतंत्र ओळखही निर्माण करते. अशी गीते या वेळी सादर करण्यात येणार आहेत.

प्रत्येक गाणे स्वरबद्ध करताना विशिष्ट वाद्यच का वापरले गेले, याबद्दलचे विवेचन करून, त्या वाद्याची माहिती देत, त्या वाद्यावर आधारित काही गाणी या वेळी सादर केली जातील. गीतातील शब्दांची जागा कधीकधी वाद्येच कशी घेतात, याचे प्रात्यक्षिक यानिमित्ताने रसिकांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमात, सत्यजित प्रभू, अमर ओक, महेश खानोलकर, नीलेश परब, अर्चिस लेले, दत्ता तावडे यांच्यासारखे कलावंत सहभागी होणार आहेत.

भारतीय अभिजात संगीताचे निसर्गाशी असलेले नाते अतूट आहे. कधी विविध रागांमधील बंदिशींमध्ये निसर्गाची वर्णने येतात, तर कधी विशिष्ट ऋतूंमध्येच गाता येतील, अशा रागांचीही निर्मिती होते. ख्याल गायनामधील गायल्या जाणाऱ्या जोड बंदिशी, ललित संगीतातील होरी, कजरी, ठुमरी, तसेच लोकसंगीतातील निसर्गदर्शन उलगडणारा ‘ऋतुरंग’ हा कार्यक्रम शुक्रवार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. आपल्या गायनशैलीने रसिकांची मने जिंकलेल्या पंडित सत्यशील देशपांडे आणि श्रीमती आरती अंकलीकर या दोघांचा सहभाग या कार्यक्रमात असेल.

वेगळेपण असे, की रागाची मांडणी, बंदिशीचे शब्द आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते उलगडणारे विवेचनही गायनाच्या बरोबरीने हे दोनही कलावंत स्वत:च करणार आहेत. हा कार्यक्रमही काशिनाथ घाणेकर नाटय़गृहातच होणार आहे. संगीतातील दोन समांतर प्रवाहांचे हे मनोज्ञ स्वरदर्शन ठाण्यातील रसिकांसाठी एक अपूर्व पर्वणी ठरणार आहे.

प्रवेशिका आज सायंकाळपासून

दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांच्या प्रवेशिका आज, मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत काशिनाथ घाणेकर नाटय़गृहावर उपलब्ध असतील. बुधवारपासून त्या सायंकाळप्रमाणेच रोज सकाळी साडेआठ ते साडेअकरा या वेळेत मिळू शकतील.

सहप्रायोजक : * केसरी टूर्स

रूणवाल ग्रुप *  दोस्ती ग्रुप ल्लरुस्तमजी ग्रुप