सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची प्रशासनावर टीका; नादुरुस्त शौचालये, कचऱ्याच्या ढीगांकडे बोट

ठाणे : देशाच्या स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे शहराने चौदावा आणि राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असला तरी नगरसेवकांनी मात्र शहराच्या दैन्यावस्थेकडे बोट दाखवत प्रशासनावर हल्लाबोल केला. ठाणे महापालिका हद्दीतील ४२३ सार्वजनिक शौचालये नादुरुस्त असून याठिकाणी वीज, पाणीही नाही. गेल्या काही दिवसांपासून कचरावेचक नसल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात ठाण्याला वरचा क्रमांक मिळाला तरी कसा असा सवालच सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केला.

यंदाच्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे शहराने देशात चौदावा, तर राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.  त्याचबरोबर कचरामुक्त शहर आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या देशभरातील महापालिकांना दिल्या जाणाऱ्या मानांकनामध्ये ठाणे महापालिकेला ‘थ्री स्टार’ नामांकन जाहीर झाले आहे. असे असतानाच शहरातील अस्वच्छतेचा पाढाच सोमवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी वाचला. अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे आणि शौचभांडी तुटली आहेत. तिथे पाणी आणि विजेचीही सुविधा नाही. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. या कामांसाठी निधी नसल्याचे आयुक्तांना सांगितले जाते, असे सांगत विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रभागातील शौचालयांच्या दुरवस्थेची व्यथा मांडत त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याची ओरड केली. त्यात सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांचाही समावेश होता.

मेट्रो कामामध्ये बाधित होणारे शौचालये दुसरीकडे उभारणीसाठी एमएमआरडीएकडून निधी मिळाला असला तरी प्रशासनाला अद्याप जागा सापडत नसल्याची टीका नगरसेवक विकास रेपाळे यांनी केली. शहरात अनेक ठिकाणी धोकादायक शौचालयांची बांधकामे पाडण्याची कामे ठप्प झाल्याचा दावा नगरसेवकांनी केला. तसेच धोकादायक शौचालय पाडण्याच्या अधिकृत कामांच्या नस्तीवर आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे स्वाक्षरी करीत नसल्याचा आरोप सभागृह नेते अशोक वैती यांनी केला. ठाणे पालिका क्षेत्रात कचरा साचू नये म्हणून कचरावेचक नेमण्यात आले होते, परंतु त्यांनी काम बंद केल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शौचालये नादुरुस्त आणि कचऱ्याचे ढीग साचलेले असतानाही पालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक कसा आला असा प्रश्न नगरसेवकांनीच उपस्थित केला.

शौचालयांची कामे लवकरच

ठाणे महापालिका क्षेत्रातील ४२३ नादुरुस्त शौचालयांची यादी तयार करण्यात आली असून या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यातून ठेकेदाराची निवड करून ही कामे लवकरच सुरू केली जाणार असल्याचे पालिकेचे नगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी स्पष्ट केले. तर प्रभाग समिती स्तरावर ही कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले. त्याचबरोबर अर्बन रेस्ट रूम आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारलेले शौचालयेही सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सभा तहकूब

कचरामुक्त शहर आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या देशभरातील महापालिकांना दिल्या जाणाऱ्या मानांकनामध्ये ठाणे महापालिकेला ‘थ्री स्टार’ नामांकन जाहीर झाले आहे. याबाबतची माहिती प्रशासनाने पालिका पदाधिकाऱ्यांपासून लपवून ठेवल्याचा आरोप सभागृह नेते अशोक वैती यांनी केला. हा महापौरांसह संपूर्ण ठाणेकरांचा अपमान असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध करत सभा तहकूब केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. यावेळी महापौरांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘गेल्या काही वर्षांपासून नगरसेवकांना कमी लेखण्याची परंपरा सुरू असून पुरस्काराची माहिती महापौरांपासून दडवून परस्पर जाऊन पुरस्कार स्वीकारणे हे त्याचेच उदाहरण आहे. पूर्वीसारखा लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष होऊ नये म्हणून शांत आणि संयमाची भूमिका घेतोय. झाकलेली मूठ उघडायला लावू नका,’ असा इशारा महापौरांनी दिला.