रहिवाशांचा एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा

डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील गोळवली येथील रिजन्सी गृहसंकुलात मागील आठ महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा वाढवून मिळत नसल्याने रिजन्सी गृहसंकुलातील रहिवाशांनी गुरुवारी एमआयडीसीच्या डोंबिवली विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकरांनी पाणी वाढवून देण्याची अधिकाऱ्यांकडे मागणी केली. लाखो रुपयांची पाण्याची देयकेभरूनही मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गोळवली गाव हद्दीत शिळफाटा रस्त्यालगत रिजन्सी गृहनिर्माण वसाहत आहे. २४ इमारती येथे आहेत. सुमारे पाच ते सहा हजार लोकवस्ती येथे आहे. या वस्तीला एमआयडीसीकडून दररोज सुमारे आठ लाख ६७ हजार लिटर पाणी साठा मंजूर आहे. या साठय़ाप्रमाणे संकुलाला पाणीपुरवठा होणे आवश्यक असताना चार लाख ७५ हजार लिटर पाणीपुरवठा होतो. उर्वरित सुमारे चार लाख पाणीपुरवठा कमी का झाला आहे, तो कोठे वळविण्यात आला आहे का, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. सुरुवातीच्या काळात गृह प्रकल्पाला मुबलक पाणीपुरवठा होत होता. आठ महिन्यांपासून मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना खासगी टँकर, पाणी विक्रेत्याकडून पाणी खरेदी करून पाण्याची तहान भागवावी लागते. गेल्या आठ महिन्यांत टँकरवरील पाण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. सतत टँकरचे पाणी पिऊन अनेक रहिवाशांचे आरोग्य बिघडले आहे. अन्य उपाय नसल्याने टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही, असे सचिव चंद्रहास चौधरी यांनी सांगितले. रिजन्सी गृह संकुलाच्या आजूबाजूच्या वस्ती, गावाला पुरेशा दाबाने एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. मग, रिजन्सी वस्तीला का कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. हेतुपुरस्सर छळ रहिवाशांचा केला जात आहे, असा आरोप रहिवाशांनी केला. रिजन्सी संकुल ते एमआयडीसी दोन किलोमीटर अंतरावरून रिजन्सी संकुलातील रहिवासी पाणी वाढविण्याची मागणी करत चालत आले.