कल्याण- गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी संदर्भात कल्याण, डोंबिवलीतील एकही शिवसैनिक उघडपणे बोलत नसला तरी, कल्याण मधील ज्येष्ठ रोखठोक बाण्याचे शिवसैनिक काक हरदास यांनी प्रथमच शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य केले. शिंदे यांनी बंड केले काय, ईडीची भीती कोणी कोणाला दाखविली काय, शिंदे समर्थक बिल्डर सोडले तर कल्याणमधील शिवसेनाप्रमुखांचा निष्ठावान कडवट शिवसैनिक हा उध्दव ठाकरे यांच्या सोबतच असेल, असे स्पष्ट मत काका हरदास यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींनी काका हरदास यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे यांच्या पाठिशी ४० आमदार आहेत असे म्हणतात. या सगळ्यांना स्वतंत्र गट म्हणून नव्हे तर भाजपमध्ये प्रवेश करण्यास सांगून मगच उपमुख्यमंत्री, मंत्रिपदे दिली जातील, हे आपले भाकीत आहे, असे काका म्हणाले.

शिंदे यांची बंडखोरी पाहिली तर अतिशय खालच्या पातळीचे किळसवाणे राजकारण राज्यात सुरू आहे. शिंदे यांना राज्य सरकारमधील काही विषय पटत नव्हते. पक्षांतर्गत विषयात काही बोलायचे होते तर त्यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क साधणे आवश्यक होते. सेना, नेत्या मंत्र्यांसमोर बोलणे आवश्यक होते. चर्चेतून प्रश्न सुटला असता. ही वेळ आली नसती, असे काका म्हणाले.

शिंदे यांनी बंडखोरी करताना जे मुद्दे मांडले आहेत ते न पटणारे आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वापासून सेना दूर चालली आहे. हिंदुत्व विचार म्हणजे काय हे शिंदे यांनी स्पष्ट करावे. हिंदुत्व हे कोणी ओढून, ओरबाडून घेऊ शकत नाही. विकास कामांसाठी निधी मिळत नाही असे कारण पुढे करण्यात आले आहे. यापूर्वी भाजप सरकारच्या काळात पालकमंत्री एकनाथ शिंदे निधी देत नाहीत म्हणून एकाने थेट मुख्यमंत्र्यासमोर तक्रार केली होती. मग आता ही निधीची नाटके कशासाठी आणि कोणासाठी असा प्रश्न काका यांनी केला.

शिंदे यांच्या बंडखोरीमागे मोठे राजकारण आणि त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. भाजपची सत्ता गेल्याने ते तडफडत आहेत. ईडी चौकशीचा ससेमिरा अशी भीती घालून ते सरकार डळमळीत करत आहेत. आता सुध्दा तेच चित्र आहे. कल्याणमधील दोन चार विकासक शिवसैनिक सोडले तर कल्याणचा सर्व निष्ठावान शिवसैनिक हा उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी आहे, असे काका म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री म्हणून पहिले नाव एकनाथ शिंदे यांचे पुढे आले होते. शरद पवार यांच्या आग्रहामुळे उध्दव यांना ते पद स्वीकारावे लागले.

उध्दव ठाकरे यांनी अडिच वर्ष चांगल्या पध्दतीने कारभार पाहिला. त्यात करोना महासाथ सुरू झाली. केंद्र सरकारने विकास निधी, जीएसटीची राज्याची रक्कम न देणे असे अनेक अडथळे आघाडी सरकार समोर उभे केले. विरोधी पक्षाने राज्य हिताची भूमिका न घेता वैयक्तिक पातळीवर घाणेरडे राजकारण केले. कृपाशंकर सिंह, नारायण राणे असे इतर खूप पवित्र म्हणून भाजपच्या वाटेवर गेले का, असा प्रश्न करत काका हरदास यांनी ४० जण म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर आहेत. प्रत्येकाचा हात कुठेना कुठे सापडला आहे. आर्थिक देवाणघेवाणीत अडकले आहेत म्हणून बचावासाठी यांनी शिंदे यांचा मार्ग धरला आहे. बाकी कुंपणावरचे काही जण सोडले तर निष्ठावान शिवसैनिक हा उध्दव ठाकरे यांच्याच पाठिशी आहे, असे काका म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loyal shiv sainik uddhav thackeray information senior shiv sainik kaka hardas ysh
First published on: 23-06-2022 at 19:52 IST