जयेश सामंत/ नीलेश पानमंद

ठाणे : आमदारांचे बंड, त्यानंतर झालेला सत्ताबदल आणि शिवसेना नेमकी कुणाची यावरून सुरू असलेला न्यायालयीन वाद ताजा असताना शुक्रवारी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या येथील हक्काच्या मतदारांना पुन्हा भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला एकीकडे भगदाड पडले असताना उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवणारे खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाका या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘निष्ठे’ची हंडी उभारत शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची छबी असलेले बॅनर झळकवत शिंदे गटाने हिंदूत्वाचा नारा देत शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना शिवसेनाप्रमुखांच्या जुन्या भूमिकांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला.

शिंदे यांच्या बंडाला ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व आमदारांनी पाठिंबा दिला आहे. शिवाय जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक शहरातून तसेच ग्रामीण भागातही शिवसेनेत उभी फूट पडली असून आपला बालेकिल्ला मजबूत राहावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शपथग्रहण करताच जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पक्षात एकीकडे मोठी पडझड होत असली तरी ठाण्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी मात्र अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. शिंदे यांच्या बंडानंतर सुरुवातीचे काही दिवस खासदार विचारे यांच्या भूमिकेबद्दल संभ्रमाचे वातावरण होते. नंतरच्या काळात मात्र विचारे यांनी जाहीरपणे ‘मातोश्री’च्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळे ठाण्याच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाविरोधात विचारे यांच्या माध्यमातून पुन्हा संघटनेची बांधणी करण्यास मातोश्रीवरून सुरुवात झाली आहे. विचारे यांनी दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना सोबत घेत वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यास सुरुवात केली असून जुन्या ठाण्यातील शिवसेनेच्या काही शाखांमधून त्यांना प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मध्यरात्री विचारे यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक टेंभीनाक्यावर ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जमल्याने शिंदे गट आणि उद्धव गट ठाण्यात पहिल्यांदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने या दोन्ही गटांकडून शुक्रवारी शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न करण्यात आला. टेंभीनाक्यावर धर्मवीर आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव सुरू केला होता. दिघे यांच्यानंतर जिल्हाप्रमुख या नात्याने एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे जोमाने सुरू ठेवला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे यांच्यासोबत राहिलेले खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील जांभळीनाका भागात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. हे करत असताना यंदा ठाण्याच्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर लावले जातील, अशी भूमिका मांडत खा. विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

फलकांवर शिवसेनाप्रमुखांची वक्तव्ये

शिंदे गटाने टेंभीनाका येथील उभारलेल्या बॅनरमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जुनी वक्तव्ये, त्यांनी हिंदूत्वाच्या मांडलेल्या प्रखर विचारांची पद्धतशीर मांडणी करत विचारे यांना शह देण्याचा प्रयत्न तर केलाच शिवाय ठाण्यातील जुन्या, कट्टर शिवसेना मतदारांनाही नव्याने साद घालण्याचा प्रयत्न केला. ‘मतदानाच्या वेळी शिव्या द्यायच्या आणि नंतर त्यांच्यासोबत आघाडी करायची., मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, आज जो मानसन्मान मिळतोय तो हिंदूत्वामुळे आणि भगव्या झेंडय़ामुळे’, असा मजकूर असलेले बॅनर टेंभीनाक्यावर शिंदे गटाकडून उभारण्यात आले. ‘शिवसेनेला जागा कमी पडत असतील तर राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना बाळासाहेबांनी नाही म्हटले होते. शत्रू हा शत्रूच असतो’, असेही म्हटले होते. असे बॅनर लावून बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विधानांचीही आठवण शिंदे गटाने ठाकरे गटाला करून दिली आहे.  टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवाच्या तयारीसाठी माजी महापौर आणि शिंदे समर्थक असलेले नरेश म्हस्के हे गुरुवार सायंकाळपासून ठाण मांडून बसले होते. या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरबाजीत त्यांचा मोठा सहभाग असल्याचे सूत्रांकडून समजते.