ठाणे/अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील सहा जनावरांना याची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील तीन, अंबरनाथ तालुक्यातील एक आणि भिवंडी तालुक्यातील दोन जनावरांचा समावेश आहे. जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून या प्राण्यांचे उपचार सुरू करण्यात आले असून लागण झालेल्या प्राण्याच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या अंतरातील प्राण्यांचे लसीकरण करण्याचे काम पशूसंवर्धन विभागाने सुरू केलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये जनावरांना लंपी सदृष्य रोगाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. यांनतर पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यामध्ये जनावरांना आजाराची लागण झाल्याचे समोर आले होते. या पाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील जनावरांना देखील या रोगाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील दोन गाई आणि एका बैलाला या आजाराची लागण झाली आहे. तर भिवंडी तालुक्यातील दोन गाई आणि अंबरनाथ तालुक्यातील एका बैलाला लंपीची लागण झाली आहे. या जनावरांना काही दिवसांपुर्वी ताप येणे, चारा खाण्याचे प्रमाण कमी होणे तसेच अंगावर ठिकठिकाणी गाठी येणे यांसारखी लक्षणे दिसून आली होती.

हेही वाचा : विश्लेषण : ठाणे जिल्ह्यातील डम्पिंग ग्राउंड समस्या का बनली आहे उग्र?

यामुळे या जनावरांच्या मालकांनी जवळच्या शासकीय पशूवैद्यकीय रुग्णालयात या जनावरांची तपासणी केली होती. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे नमुने पुणे येथे तपासणी करिता पाठविले होते. या जनावरांचे अहवाल आता सकारात्मक आले असून त्यांना लंपीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे पशूसंवर्धन विभागाने या जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे. तसेच लागण झालेल्या प्राण्याच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या अंतरातील प्राण्यांचे लसीकरण करण्याचे काम पशूसंवर्धन विभागाने सुरू केलं आहे.

कोणती काळजी घ्यावी

बाधित जनावरे निरोगी जनावरापासून वेगळी ठेवणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, डास, गोचीड यांसारख्या किड्याचा बंदोबस्त करणे, निरोगी जनावराच्या अंगावर किडे चाऊ नये यासाठी औषध लावणे. गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधाची फवारणी करणे. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध करणे. अशा मार्गदर्शक सूचना जिल्हा पशूसंवर्धन विभागाने जाहीर केल्या आहेत.

हेही वाचा : मुंबईत १८७ नवे बाधित

जिल्ह्यात लंपी रोगाचा शिरकाव झाला असून पशूसंवर्धन विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच जिल्ह्यात हा आजार अधिक जनावरांमध्ये पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी तथा जनावरांच्या मालकांनी घाबरून जाऊ नये. – समीर तोडणकर, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, ठाणे