ठाणे : उहाळय़ाच्या हंगाम सुरू झाला की मुंबई, ठाणे आणि उपनगरांमधील फळबाजारांमध्ये कोकणातून तसेच दाक्षिणात्य राज्यांमधून विक्रीसाठी येणारा आंबा सर्व ग्राहकांचे लक्ष वेधून घेतो. सध्या आंब्याबरोबरच वाशी कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये कोलकाता आणि बिहारमधून येणाऱ्या लिचीची आवक सुरू झाली आहे.
मे आणि जून केवळ दोनच महिने फळबाजारात मुबलक प्रमाणात दिसणारी रंगाला लाल, रसदार आणि चवीला आंबट गोड असणारी लिचीची यंदा चांगली विक्री होत असून येत्या एक ते दोन आठवडय़ांमध्ये याची आवक वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
लिचीची मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात विविध शहरातील फळबाजारांमध्ये आवक सुरू होते. लिचीचे अधिकतर उत्पादन हे पश्चिम बंगालमधील विविध भागांमध्ये मध्ये होते. त्या खालोखाल बिहारमधील शेतकऱ्यांकडून लिचीची लागवड केली जाते. सद्यस्थितीत वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळबाजारात कोलकाता आणि बिहार मधून येणाऱ्या लिचीची आवक सुरू झाली आहे. साधारणपणे जून महिन्याच्या अखेपर्यंत लिचीचा हंगाम असतो. या दोन महिन्यांच्या कालावधीत नागरिकांना देशांतर्गत पिकणाऱ्या लिचीची चव चाखता येते. तर या दोन महिन्यानंतर परदेशातून आयात केलेल्या लिचीची विक्री करण्यात येते. मागील काही दिवसांपासून वाशी येथील फळ बाजारात लिचीची दररोज ५ ते ९ हजार किलो इतकी आवक होत असून ग्राहक देखील याची खरेदी करत असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.
घाऊक बाजारात लिचीची विक्री ही १० किलोच्या पेटीनुसार केली जात असून सध्या एका पेटीची विक्री १,५०० रुपये तर २ हजार रुपये दराने होत आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये सुमारे २२० ते २८० रुपये किलोने लिचीची विक्री केली जात आहे.
लिचीचे फायदे
लिची हे हंगामी फळ असल्याने ग्राहक याची आवर्जून खरेदी करतात. तसेच लिची खाल्याने त्वचा तजेलदार होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते. उन्हाळय़ात जिभेला शीतलता देणाऱ्या या फळामध्ये अ आणि क जीवनसत्व असल्याने तसेच इतर पोषक घटक असल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. यामुळेही अनेक नागरिक या हंगामध्ये लिचीची खरेदी करतात.
सध्या लिचीचा हंगाम सुरू झाला असून कोलकाता आणि बिहारमधून त्याची आवक सुरू झाली आहे. ग्राहकांकडूनही हळूहळू चांगली खरेदी होत आहे. येत्या एक ते दोन आठवडय़ात याची आवक वाढेल. जून अखेपर्यंत हा हंगाम सुरू राहणार असून नागरिकांना देशातील लिचीचा आस्वाद घेता येणार आहे. – नितीन चासकर, फळविक्रेता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lychee fruit market kolkata and bihar income increase next two weeks amy
First published on: 17-05-2022 at 00:03 IST