Adv Madhavi Naik’s journey from Thane corporator to BJP MLC candidate: शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे प्रबळ वर्चस्व असलेल्या ९० च्या दशकात शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखालाच पराभूत करत ॲड. माधवी नाईक या भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर तिसऱ्यांदा त्या पराभूत झाल्या पण, खचल्या नाही. पक्षाने प्रदेश पातळीवर काम करण्याची जबाबदारी दिली आणि ती पार पाडत असतानाच पक्षाने त्यांना विधान परिषद आमदारकीची उमेदवारी दिली. एक महिला नेत्या म्हणून त्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून राज्य पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांचा नगरसेविका ते आमदारकीच्या उमेदवारीपर्यंतचा थक्क करणारा हा प्रवास नेमका कसा होता, याविषयी जाणून घेऊया.

जुन्या ठाण्यात अर्थात श्रीरंग, वृंदावन या परिसरात ॲड. माधवी नाईक या राहतात आणि याच भागाचे त्यांनी ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यांनी पक्षातील अनेक पदांवर काम केले. कोणताही राजकीय वारसा नसतानाही त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पक्षात ठसा उमटवला. विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम सुरू केले. पण त्या लग्नानंतर म्हणजेच १९९७ साली राजकारणात प्रवेश केला. याच वर्षी त्यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक पहिल्यांदा लढवली आणि ती त्यांच्या राजकीय प्रवासाला कलाटणी देणारी ठरली.

राजकीय कारकिर्दीला खरी सुरुवात

९० च्या दशकात शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा ठाण्यातील राजकारणावर मोठा दबदबा होता. शहरात त्यांना मानणारा वर्ग मोठा होता. १९९७ साली शिवसेना आणि भाजपने युतीविना ठाणे महापालिका निवडणुका लढविल्या होत्या. या निवडणुकीत ॲड. माधवी नाईक या भाजपच्या तिकिटावर श्रीरंग, वृंदावन भागातून निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात शिवसेनेने माजी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत नाईक यांनी अवघ्या १६ मतांनी बिर्जे यांचा पराभव करत लक्षवेधी विजय मिळवला आणि येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खरी सुरुवात झाली.

पराभव अन् पक्षाच्या जबाबदाऱ्या

ठाणे महापालिकेच्या २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला. मात्र २००७ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतरही पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत प्रदेश पातळीवरील जबाबदाऱ्या सोपवल्या. महिला मोर्चाच्या महामंत्रीपासून ते अध्यक्षा पदापर्यंत त्यांनी काम पाहिले. पुढे भाजपच्या मुख्य समितीत उपाध्यक्ष आणि पुढे जनरल सेक्रेटरी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या.

संघटनात्मक कामाची दखल

प्रदेश पातळीवर अनेक दिग्गज नेते इच्छुक असतानाही पक्षाने त्यांना प्राधान्य देत विधानपरिषदेची उमेदवारी दिली. स्थानिक पातळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या विधिमंडळापर्यंत पोहोचल्याने त्यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेतल्याचे मानले जात आहे. त्या पेशाने वकील असून त्यांचे वक्तृत्वही चांगले आहे. ठाणे महापालिकेच्या सभागृहात त्यांनी नेहमीच साध्या आणि सोप्या भाषेत नागरिकांच्या समस्या मांडत ठाम भूमिका मांडली आहे.

भाजपचे तीन आमदार होणार

ठाणे शहर मतदारसंघाचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे दोघेही ठाण्यातीलच आहेत. त्यापाठोपाठ आता ठाण्यातील ॲड. माधवी नाईक यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात भाजपचे तीन आमदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय केळकर हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते, निरंजन डावखरे हे युवा नेतृत्व, तर माधवी नाईक या महिला नेत्या, असा त्रिवेणी संगम साधत पक्षाने संतुलित नेतृत्व उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

ठाणे महापालिकेत दोन वेळा नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिसऱ्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पक्षाने मला घरी बसू दिले नाही, तर प्रदेश पातळीवर काम करण्याची जबाबदारी दिली. महिला प्रदेश महामंत्री म्हणून काम करताना नंतर प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे भाजपाच्या मुख्य समितीत उपाध्यक्ष तसेच पहिल्या जनरल सेक्रेटरी होण्याचा मानही मला मिळाला. पक्षाने ज्या-ज्या ठिकाणी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नांचे फळ म्हणून पक्षाने मला विधान परिषदेच्या उमेदवारीची संधी दिली आहे.-ॲड. माधवी नाईक, भाजप विधानपरिषद उमेदवार