अंबरनाथमधील आदर्श उपक्रम; दुमजली इमारतीचे बांधकाम सुरू
मदरशांमध्ये केवळ धार्मिक शिक्षण दिले जात असल्याने मुस्लीम समाजातील मुले-मुली व्यावसायिक तसेच स्पर्धात्मक शिक्षणापासून वंचित राहतात, हे कटुसत्य आहे. या पाश्र्वभूमीवर अंबरनाथ शहरातील भास्करनगर येथील मदरशामध्ये धार्मिक शिक्षणासोबतच क्रमिक अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील हिंदू आणि मुस्लीम समाज एकत्र आला आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील भास्करनगर परिसरात छप्पर बंद समाजाचे मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने राहतात. येथील दुबई गल्लीत मिस्त्री, बिगारी आदी छोटे व्यवसाय करणारे मुस्लीम नागरिक राहतात. आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने या समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणच काय पण, मदरशातही शिक्षण मिळत नाही. कारण, येथे यापूर्वी पत्र्याच्या छोटेखानी खोलीत मदरसा भरत होती. मात्र त्या खोलीची दुरवस्था झाल्याने ते शिक्षणही बंद झाले होते. मात्र आता येथील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी या समाजाची संस्था व स्थानिक हिंदू नागरिक पुढे आले असून येथे आता दुमजली मदरसा आकाराला येत आहे.
येथील शिक्षणपद्धती ही धार्मिक स्वरूपाचीच राहणार असली तरी येथे हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू आदी भाषांचे व संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येथे या भाषांच्या संबंधीचे ग्रंथालयही उभारण्यात येणार असून याची जबाबदारी येथील शिक्षक रफिक शेख यांच्यावर आहे. भविष्यात भाषा शिकविण्यासाठी बाहेरून शिक्षकही बोलावण्यात येणार आहेत. नव्या मदरशामध्ये ग्रंथालय, वातानुकूलित खोल्या, संगणक कक्ष आदी अत्याधुनिक सुविधा होणार आहेत.

संगणकांची पर्वणी
संगणक येणार हे समजल्याने तबस्सुम शेख व मुस्कान शेख या अनुक्रमे दहा व बारा वर्षांच्या मुलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कारण संगणक येणार हे समजाताच त्यांनी पुन्हा मदरशात येण्याचा निर्णय घेतला. तर, महक मुलाली छप्परबंद व अलिशा हजरत अली या सहा वर्षांच्या लहानग्या मुलींना आपली मदरसा आता मोठी होणार याचे कौतुक दिसत होते. या वेळी, आमच्या मोहल्ल्यात गरीब लोक राहत असल्याने ते उच्च शिक्षणाचा विचार करू शकत नाहीत. मात्र, मदरशात त्यांना संगणक व ग्रंथालय उपलब्ध झाल्यास त्याची आवड लागून भविष्यात त्यांनी चांगले शिक्षण घेतले तर, उच्च शिक्षणाची आमच्या पुढच्या पिढीची स्वप्ने खरी होऊ शकतात, अशी आशा येथील बादशहा शेख यांनी व्यक्त केली. या समाजाच्या छप्परबंद समाज मुस्लीम सेवक संस्थेने व उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी पुढाकार घेत ही मदरसा अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.