शासकीय सुट्टय़ांचा फायदा घेऊन रेतीचा उपसा आणि महसुलाची लूट; सक्शन पंप, ट्रॉलरच्या साहाय्याने रेतीेचे मोठय़ा प्रमाणात उत्खनन
अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाच्या आस्ते कदम कारवाईमुळे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत ठाणे खाडीत रेती माफियांनी मोठय़ा प्रमाणात रेती उपसा केला. शनिवारची बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आणि रविवार शासकीय कार्यालये बंद असल्याने कोणत्याही कारवाईचे भय नसलेल्या रेती माफियांनी ठाणे खाडीतून सक्शन पंपाने रेतीचे मोठय़ा प्रमाणात उत्खनन केले. कल्याण, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळव्यापर्यंत वेगवेगळ्या भागात हा उपसा सुरू होता. रेती माफियांची टोळधाड या भागातील खारफुटींची कत्तल करत रेती उपसा करताना दिसून येत होते. ठाण्यापर्यंत सगळ्याच भागात हे माफिया सक्शन पंप, ट्रॉलरच्या साहाय्याने शासकीय महसुलाची लूट आणि पर्यावरणाचा ऱ्हास करत असल्याचे चित्र दिसून येत होते.
ठाणे खाडीतील रेती उपशाची समस्या मोठी असून सततच्या कारवाईकडे कानाडोळा करून पुन्हा पुन्हा रेती उपसा करण्यासाठी माफिया या भागामध्ये दाखल होतात. या रेती माफियांवर कारवाईचा ससेमिरा सुरू करून जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी रेतीचा प्रचंड मोठा साठा जप्त केला होता. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडूनही रेती माफियांविरुद्ध कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुरुवातील याविषयी अधिकाऱ्यांना कडक आदेश देऊन ही कारवाई सुरू करण्यात आली होती.
मागील दोन आठवडय़ांपासून कल्याण, भिवंडी आणि ठाण्यामध्ये कारवाईला वेग आला होता. मात्र शनिवार-रविवार या दोन दिवस लागून आल्याने रेती माफियांनी रेती उपसा करून शासकीय महसुलावरही डल्ला मारण्याचा प्रताप सुरू आहे.

पूर्वेकडील भागातही रेती उपसा..
रेल्वेच्या पश्चिमेकडे ठाणे खाडीकिनारा असल्याने प्रामुख्याने या भागामध्ये रेती उपसा होतो. मात्र हा रेती उपसा रेल्वे रुळांच्या पूर्वेकडील भागातही सुरू झाला असून मुंब्रा येथील खाडीकिनाऱ्यावर खारफुटीच्या उंच झाडांमागेसुद्धा रेती उपसा करणाऱ्या बोटी आढळून येऊ लागल्या आहेत. रेती उपसून खारफुटी नष्ट करण्याचा सपाटा या मंडळींनी सुरू केला आहे. मुंब्रा खाडी पुलाच्या परिसरातील भागात मोठे ट्रॉलर आणि सक्शन पंपच्या साहाय्याने हा उपसा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशांकडून दिली जात आहे.

रेल्वे मार्ग धोक्यात..
रेल्वे रुळांच्या लगत पोहचलेल्या खाडीमध्ये हे ट्रॉलर दाखल होऊन रेती उपसा करत असल्याने रेल्वेमार्ग धोक्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये अनेक बांधकामांची सुरुवात केली जात असल्याने पावसाळ्यापूर्वी रेती काढून तिची विक्री केली जाते. त्यामुळे या काळात रेती उपशाला जोर चढला आहे. अधिकृत पद्धतीने काढलेल्या रेतीचे साठे मर्यादित असल्याने अनधिकृत पद्धतीने काढलेल्या रेतीला अधिक किंमत मिळते.त्यामुळे चोरटय़ा रेतीला मोठी मागणी असते. रेती उपशामुळे रेल्वे रूळ आणि मुंब्रा येथील पुलालाही धोका निर्माण झाल्याने बेकायदेशीर रित्या सुरू रेती उपशावर सुट्टीच्या काळातही प्रशासनाने कारवाई करावी.