ठाणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, २८ जून २०२६ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ पेपर फुटीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत टीईटी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संशयितांकडे आढळलेल्या प्रश्नांशी जुळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटी नंतर अवघ्या काही आठवड्यातच ठाणे जिल्ह्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने एकूणच शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, उद्या २८ जून रोजी राज्यभर एकूण १,०२८ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. नुकत्याच देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर परिषदेने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना केल्याचा दावा केला होता. मात्र, परीक्षा होण्याच्या काही तासांपूर्वीच मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, २७ जून रोजी पहाटे भिवंडी येथे काही इसमांकडे टीईटी प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकून संशयितांची चौकशी केली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत संशयितांकडे आढळलेल्या काही प्रश्नांचा टीईटी २०२६ च्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी साधर्म्य असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला.
या घडामोडीनंतर परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षेच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे परिषदेने म्हटले आहे.
गेल्या काही काळात नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षेबाबतही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा रद्द न करता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, परीक्षेच्या नव्या तारखेसह पुढील सर्व अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. आता या पेपरफुटीमागे नेमके कोण आहे, प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
