बदलापूरः महाविकास आघाडीकडून कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी आठ पक्षांची मोट बांधण्यात आली आहे. यात ठाकरेंच्या शिवसेनेला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. ज्या प्रभागात ज्या पक्षाची ताकद आहे त्यानुसार जागांचे वाटप केले जाणार आहे. २० प्रभागात उमेदवार निश्चित झाले असून चार प्रभागात लवकरच उमेदवार निश्चित करून जागावाटप जाहीर केले जाणार आहे. सर्व पक्षांना समान संधी देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचे आघाडीकडून सांगितले जाते आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीतील पक्ष शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकमेकांविरूद्ध प्रचारात आघाडीत घेताना दिसत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या गोटात शांतता असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात बदलापूर शहराचा समावेश आहे. येथून भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा सुरेश म्हात्रे यांनी पराभव केला. त्यामुळे त्याचा फायदा कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला होईल अशी आशा आहे. एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष युती करून महायुतीतील शिवसेना पक्षाविरूद्ध रिंगणात उतरले आहे.
मात्र आता महाविकास आघाडीने उमेदवार यादी तयार केली असून लवकरच ती प्रसिद्ध केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा महाविकास आघाडीत आठ पक्षांचा समावेश असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्ष, कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपाई (आर के गट), बहुजन मुक्ती पार्टी आणि मनसे महाविकास आघाडीचा भाग असणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
आतापर्यंत २० प्रभागात उमेदवार अंतिम झाले असू इतरही उमेदवार लवकरच जाहीर होतील. आम्हाला शहराला विकासाकडे न्यायचे आहे. आमच्या प्रचारात विकासाचे मुद्दे असतील आणि आम्ही महायुतीसारखी चिखलफेक करणार नाही, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे किशोर पाटील यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अविनाश देशमुख यांनी, आम्ही आठ पक्षांची मोट बांधली आहे. सर्व पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेत केंद्रीय मंत्र्यांचा पराभव केला. आताही महायुतीचा पराभव करू असे सांगितले. यावेळी महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे संभाव्य जागा वाटप
शिवसेना (ठाकरे) -१२ जागा,
बहुजन मुक्ती पार्टी ११ जागा,
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार ) ६ जागा,
कॉंग्रेस ५,
मनसे ३,
वंचित बहुजन आघाडी ५,
आम आमदी पार्टी २,
रिपाई (आरके) १ (इतर जागांवर अद्याप निर्णय नाही)
