ठाणे, मुलुंड, ऐरोली येथील टोलनाक्यावर एमएच ०४ आणि ०५ या वाहन नोंदणी असलेल्या वाहनांना टोलमुक्ती द्यावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली. गरज नसतानाही काही ठिकाणी दुभाजक बसविण्यात आले आहे. यामुळे शहरात निर्माण होत असलेली वाहतुक कोंडी सोडविण्यात यावी अन्यथा वाहतुक पोलिसांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा >>> ठाणे स्थानकातील नवे पादचारी पुल डिसेंबरअखेर खुले होणार ?पुलाचे बांधकाम वेगाने सुरू
ठाण्यातील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात महाविकास आघाडीने वाहतुकीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील रस्त्यांवर फेरीवाले बसविले जात आहेत. अवजड वाहनांची संख्या वाढत आहे. बांधकाम व्यवसायिकांची मालवाहू वाहने, खाजगी बसगाड्या यामुळे प्रंचड वाहतुक कोंडी होत आहे. महापालिका, वाहतुक पोलीस, एमएमआरडीएमुळे करदात्यांचा पैसा दुभाजक बसविण्यावर खर्च होत असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला.
हेही वाचा >>> मुंब्ऱ्यात पाच अनधिकृत इमारतींवर कारवाई
पर्यायी रस्ते निर्माण करणे, भुयारी मार्ग आणि रस्ते रुंद करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. मतांसाठी शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांना बसविले जात आहेत. त्याचा सामान्य जनतेला त्रास होत आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदुषण होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचेही ते म्हणाले. टोलनाक्यावर बेकायदेशीर रित्या टोल वसूल केला जात आहे. टोलमाफीसाठी मनसे आंदोलन घेतले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील टोल विरोधात आंदोलन केले होते. परंतु अद्यापही टोल रद्द झालेला नाही. मनसेला आमचा पाठींबा नाही, मात्र त्यांनी घेतलेल्या भुमिकेला आमचा पाठींबा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
सुमीत बाबा कोण ? हा सुमीत बाबा कोण आहे? ठाण्यात कुठेही कसेही रस्त्यात दुभाजक बसविले जात आहेत. त्यांच्यामार्फत करण्यात आलेल्या बदलांचा फटका ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. त्याने केलेल्या बदलामुळे शहरात वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्तांच्या खुर्चीवर त्या बाबाला बसवा अशी टिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी केली.