कल्याण-डोंबिवलीत भाज्यांची आवक वाढली

कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या परिसराला भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या घाऊक आवारात दोन दिवसांपासून भाज्यांचा पुरवठा वाढला असला तरी किरकोळीची भाजी अजूनही चढय़ा दराने विकली जात असल्याचे चित्र आहे. फ्लॉवर, शिमला मिरची, वांगी, भेंडी अशा प्रमुख भाज्यांचे किरकोळ बाजारातील दर अजूनही किलोमागे ६० रुपयांच्या आसपास असून घाऊक बाजारात आवक वाढूनही किरकोळ विक्रेते दर कमी करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

शेतकरी संपाचा घाऊक बाजारातील आवकेवर फारसा फरक जाणवत नसल्याचा दावा बाजार समितीमार्फत केला जात असला तरी सर्वसामान्यांचा ज्या किरकोळ बाजाराशी संबंध येतो तेथील दरांवर मात्र कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

राज्याच्या विविध भागांतील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी संपावर उतरला असला तरी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी पहाटेपर्यंत १२९ ट्रक, टेम्पो भाजीपाला घेऊन दाखल झाले होते. या ट्रकमधून सहा हजार क्विंटल भाजीपाला, धान्य बाजार समितीच्या आवारात दाखल झाले आहेत.

संपाचा कोणताही परिणाम बाजार समितीमधील व्यवहारांवर झालेला नाही, असा दावा कल्याण बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी केला असला तरी किरकोळीच्या लुटीविषयी बाजार समितीची हतबलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, गुजरात तसेच आसपासच्या बागायती परिसरातून भाज्यांची आवक होत असते. दररोज या बाजारात होणाऱ्या भाज्यांच्या आवकेच्या तुलनेत गेल्या काही दिवसांत घसरण झाली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी बाजार समितीकडे येणारे ट्रक अडवून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे ते ट्रक कल्याणपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

संपामुळे भाज्यांचे घाऊक भाव भडकतील अशी भीती वाटत होती. पण, घाऊक बाजारातील दर नेहमीच्या बाजारभावाप्रमाणे आहेत, असा दावा केला जात आहे. संपाचा फार मोठा परिणाम बाजार समितीमधील उलाढाल पाहता झालेला नाही, असे घोडविंदे म्हणाले.