Maharashtra First Outlet Mall in Bhiwandi: राज्यातील पहिल्या समर्पित ‘आउटलेट मॉल’चे उद्घाटन भिवंडीत झाले असून या माॅलला ‘आऊटलेट माॅल ऑफ इंडिया’ असे नाव दिले गेले आहे. भुमी वर्ल्ड समूहाने विकसित केलेला हा मॉल भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या भिवंडी बायपास जवळ सुरू झाला असून, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ग्राहकांसाठी तो नवे आकर्षण ठरणार आहे. मॉलचा पहिला टप्पा सुरू झाला असून, पुढील काही महिन्यांत आणखी अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय ब्रँड्स येथे दाखल होणार आहेत.
भिवंडी शहरात मागील काही वर्षांमध्ये अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यालय, लाॅजिस्टिक विकसित झाले आहे. एकेकाळी भिवंडी शहर हे अनधिकृत गोदामांसाठी ओळखले जात होते. परंतु आता बदल घडू लागला आहे. भिवंडी हे आतापर्यंत देशातील प्रमुख वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून ओळखले जात होते. मात्र या प्रकल्पामुळे शहराची ओळख आता रिटेल, शॉपिंग आणि मनोरंजन केंद्र म्हणूनही निर्माण होणार आहे. विविध नामांकित कंपन्यांसह आता ‘आऊटलेट माॅल ऑफ इंडिया’ हा माॅल देखील विकसित झाला आहे. समृद्धी महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांमुळे या मॉलपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.
या मॉलची सर्वात मोठी खासियत म्हणजे ‘वर्षभर सवलत’ ही संकल्पना. पारंपरिक मॉलप्रमाणे केवळ सणासुदीच्या काळात नव्हे, तर वर्षातील ३६५ दिवस नामांकित ब्रँड्सवर सवलती उपलब्ध असतील. ग्राहकांना एकाच छताखाली फॅशन, लाइफस्टाइल, स्पोर्ट्सवेअर, फूटवेअर, ॲक्सेसरीज आणि गृहउपयोगी विविध वस्तू आकर्षक दरात खरेदी करता येणार आहेत. मॉलमध्ये १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून अनेक नामांकित ब्रँड्सचा समावेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वस्तूंवर ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
