ठाणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि विशेषतः डिझेलच्या मागणीत लक्षणीय वाढ होत असतानाही इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन ऑईलकडून विविध प्रभावी उपायोजना राबविण्यात येत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये डिझेलची मागणी जवळपास दुप्पट झाली असली तरी राज्यातील कोणत्याही भागात इंधनटंचाई निर्माण होऊ नये यासाठी कंपनीची यंत्रणा चोवीस तास कार्यरत असल्याची माहिती इंडियन ऑईलकडून देण्यात आली.

राज्यात मे २०२६ या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये डिझेल विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. अहमदनगरमध्ये डिझेल विक्रीत ५७.४ टक्के वाढ झाली असून बीडमध्ये ५९.१ टक्के, सांगलीमध्ये ५१.४ टक्के, उस्मानाबादमध्ये ५२.६ टक्के, अकोल्यात ४७.७ टक्के, अमरावतीत ४६.४ टक्के तर नांदेडमध्ये ४६ टक्के वाढ झाली आहे. पेट्रोलच्या विक्रीतही वाढीचा कल दिसून आला असून रायगडमध्ये २०.४ टक्के, साताऱ्यात २३.६ टक्के आणि सांगलीत १६.७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

इंडियन ऑईलच्या प्राथमिक विश्लेषणानुसार, खासगी इंधन विक्री केंद्रांवरील ग्राहकांचा ओघ सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोलपंपांकडे वळणे तसेच मोठ्या ग्राहकांकडून थेट खरेदीऐवजी किरकोळ विक्री केंद्रांमधून इंधन खरेदी होणे, ही मागणी वाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने राज्य प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. किरकोळ ग्राहकांसाठी असलेल्या इंधनाचा अनधिकृत साठा करणे, काळाबाजार करणे किंवा इंधनाचे टँकर अन्यत्र वळवणे यांसारख्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विविध उद्योग संघटनांनाही अधिकृत मार्गानेच इंधन खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन उपलब्धतेबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी इंडियन ऑईलने नागरिकांना दिलासा दिला आहे. कंपनीच्या देशव्यापी टर्मिनल्स, डेपो, पाइपलाइन नेटवर्क, एलपीजी बॉटलिंग प्रकल्प आणि किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून पुरवठा साखळी सक्षमपणे कार्यरत असून महाराष्ट्रासह देशभरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. राज्य प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत इंधन पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना अडचणी येऊ नयेत यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.

इंडियन ऑईलने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अतिरिक्त इंधन खरेदी करण्याची आवश्यकता नसून इंधन उपलब्धते संदर्भातील माहिती केवळ अधिकृत स्रोतांकडूनच घ्यावी, असे आवाहन कंपनीने केले आहे.