ठाणे – देशभरात इंधनाच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही इंधन पुरवठा सुरळीत राखण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवली आहे. सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन ऑईलने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंड व सुरळीत पुरवठा कायम असल्याचे स्पष्ट करत राज्य प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याची माहिती दिली.
देशातील विविध भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रात, गेल्या काही दिवसांत इंधनाच्या मागणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. १ ते २८ मे २०२६ या कालावधीत इंडियन ऑईलच्या किरकोळ डिझेल विक्रीत महाराष्ट्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ३१.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर, बीड, सांगली, नांदेड, उस्मानाबाद आणि सोलापूर यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून काही ठिकाणी ही वाढ ५० टक्क्यांहून अधिक नोंदविण्यात आली आहे.
ग्रामीण भागात सुरू असलेल्या मशागत, कापणी आणि शेतीशी संबंधित हंगामी कामांमुळे डिझेलच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या तुलनेत खासगी पुरवठादारांच्या किंमतींमध्ये असलेल्या फरकामुळे ग्राहकांचा ओढा सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोल पंपांकडे वाढत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांकडूनही अतिरिक्त मागणी निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईलने आपल्या विस्तृत टर्मिनल्स, डेपो, पाइपलाइन नेटवर्क, एलपीजी बॉटलिंग प्रकल्प आणि किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून अखंड पुरवठा सुरू ठेवला आहे. इंधन पुरवठा पथके, वाहतूक व्यवस्था आणि टर्मिनल संचालन यंत्रणा चोवीस तास कार्यरत असून बाजारपेठेत वेळेवर पुनर्भरण आणि सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
इंडियन ऑईलने ग्राहकांना आश्वस्त करताना देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी नेहमीप्रमाणे इंधन खरेदी करावी, अनावश्यक साठेबाजी किंवा घाईघाईने खरेदी टाळावी, असे आवाहन कंपनीने केले आहे.
इंधन उपलब्धतेबाबतची माहिती मिळविताना नागरिकांनी केवळ इंडियन ऑईलच्या अधिकृत माध्यमांवर आणि अधिकृत संस्थांकडून जारी करण्यात येणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
