पहिल्या टप्यात ५ कोटी निधी महापालिकेकडे वर्ग

ठाणे : करोना काळापासून विविध विभागांच्या उत्पन्न वसुलीवर झालेला परिणाम आणि साडे तीन हजार कोटी रुपयांहून अधिकचे दायित्व अशी महापालिकेची अवस्था असल्याने विकासकामे रखडण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ठाणेकर असलेले एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ६० कोटी निधी देऊन महापालिकेच्या विकासाची दारे खुली केली आहेत. पहिल्या टप्प्यात ५ कोटी निधी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला असून या निधीतून शहरातील विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफ सफाई करून त्यातील पाणी पिण्यायोग्य करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात सुटण्याची चिन्हे आहेत.

करोना काळात ठाणे महापालिकेच्या विविध विभागांच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला. त्यातच करोना उपाययोजनांवर पालिकेचा मोठा निधी खर्च झाला. शिवाय, यापूर्वी पालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांच्या खर्चाचा भर पुढील तीन ते चार वर्षाच्या अर्थसंकल्पावर आधीच टाकण्यात आला होता. यामुळे पालिकेवर साडे तीन हजार कोटी रुपयांहून अधिकचे दायित्व झाले आहे. ठेकेदारांना कामाचे पैसे देण्यासाठी पालिकेच्या तिजोरीत निधीच नसून यामुळे मालमत्ता कर तसेच पाणी देयकातून जमा होणाऱ्या पैशातून ठेकेदारांना २५ टक्केच देयके दिली जात आहेत. शहरात नवीन कामे करण्यासाठी पालिकेकडे निधी नसून पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना या विभागामार्फत २४० कोटी रुपयांचा निधी रस्ते कामांसाठी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे यांनी पालिकेला ६० कोटी निधीचा देऊन शहरातील विकासाची दारे खुली केली आहेत. या निधीतून शहरातील विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफ सफाई करण्यात येणार असून त्याद्वारे विहिरींचे पाणी पिण्यायोग्य करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात सुटण्याची चिन्हे आहेत.

शहरातील शंभरहुन अधिक जुन्या विहिरी पुर्नजीवित होणार

ठाणे शहरातील विहिरीची साफसफाई करून त्यातील पाणी पिण्यायोग्य करावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करत त्यासाठी निधी दिल्याने शहरातील शंभरहुन अधिक जुन्या विहिरी पुर्नजीवित होणार आहेत. विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात सर्व विहिरींची खोदाई करून साफसफाई केली जाईल. विहिरी या पाण्याच्या स्थानिक नैसर्गिक स्त्रोत असल्याने त्यातील पाण्याचे झरे जिवंत केले जातील. जर कोणत्या विहिरीत सांडपाणी सोडले जात असेल तर ते बंद केले जाईल. म्हणजे विहिरींमधील जलप्रदूषण पूर्णपणे थांबवून तेथे विहिरीचे कठडे नव्याने बांधणे असेल किंवा आतून प्लास्टरिंग करणे असेल अशी सगळी कामे या संवर्धन प्रकल्पात केली जातील. यामुळे सर्व विहिरी स्वच्छ राहतील आणि पुर्नजीवित होतील, असा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

पाणी टंचाईची समस्या सुटण्याची चिन्हे

ठाणे महापालिका क्षेत्राचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्या तुलनेत शहरात होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागला आहे. काही वेळेस तांत्रिक बिघाडामुळे किंवा जलवाहिन्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. तसेच धरणातील पाणी जून महिन्यापर्यंत पुरेल इतके नियोजन करण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणी कपात लागू करण्यात येते. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी विहिरींची साफसफाई करून त्यातील नैसर्गिक झरे जिवंत केले जाणार असून त्याचबरोबर हे पाणी पिण्यायोग्य केले जाणार असल्याचे शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटू शकेल असा दावा करण्यात येत आहे.