भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पूर्ण प्रभाव, नियंत्रण असलेल्या ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली पालिकेला विकास कामांसाठी कोठेही निधी कमी पडता कामा नये. आगामी पालिका निवडणुकींचा विचार करुन या दोन्ही पालिकांच्या अर्थसंकल्पात विकासाची भरीव तरतूद असावी, हा विचार करुन काही शासकीय निधी पालिकेकडे वळता करुन या पालिकांची अर्थसंकल्पीय स्थिती भक्कम करण्याच्या जोरदार हालचाली शासन पातळीवर सुरू आहेत.

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
property developers Kalyan seized
कल्याणमधील २६ विकासकांच्या ११४ कोटींच्या मालमत्ता जप्त, ८८ हजार ८७६ चौरस मीटरच्या मालमत्तांचा लिलाव
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

या निधीची जुळवाजुळव झाली की तात्काळ ठाणे, कल्याण डोंबिवली पालिकेचे अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता मंत्रालयातील एका वरिष्ठ सुत्राने व्यक्त केली. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करण्याची कल्याण डोंबिवली पालिका, ठाणे पालिकेची परंपरा आहे. अनेक वर्षानंतर प्रथमच या दोन्ही पालिकांचे अर्थसंकल्प सादर होण्यास उशीर होत आहे.

हेही वाचा >>> शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांना धक्का, डोंबिवलीतील दत्तनगरमधील ९० अपात्र लाभार्थींना ‘झोपू’ योजनेत घरे देण्याचा विषय स्थगित

गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून कल्याण डोंबिवली पालिका, ठाणे पालिका प्रशासनाने विविध विभागातील विकास कामे, निधीची उपलब्धता याविषयी माहिती घेऊन अर्थसंकल्पाचे प्रारुप तयार केले आहे. महसुली उत्पन्न, खर्चाचा मेळ साधून फक्त अर्थसंकल्प सादर करणे प्रशासनाचे काम असताना अद्याप या दोन्ही पालिकांचे अर्थसंकल्प सादर होत नसल्याने शहरातील विविध क्षेत्रातील जाणकार, या अर्थसंकल्पाकडे लक्ष असलेले पालिकेशी संबंधित जाणकार, माजी पदाधिकारी, नगरसेवक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

पालिकांचे महसुली स्त्रोत घटल्याने बहुतांशी पालिका शासनाकडून विविध माध्यमातून मिळणाऱ्या अनुदान, निधीवर अवलंबून आहेत. या निधीची उपलब्धता झाली नाही तर कल्याण डोंबिवली पालिकेसारखी महापालिका विकासाचे एकही काम स्वताच्या महसुलातून हाती घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. गेल्या वर्षीच्या महसुली उत्पन्नापेक्ष चालू वर्षी कल्याण डोंबिवली पालिका बाराशे कोटीने मागे असल्याची विश्वसनीय माहिती आहे. संगणकीकरण उन्नत्तीकरणाच्या नावाखाली पालिकेची ऑनलाईन यंत्रणा सात ते आठ महिने ठप्प होती. महसुली उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. आतापर्यंत मालमत्ता कर वसुलीतून ३०० कोटीहून अधिक कर वसूल करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंत ४२५ कोटीचा मालमत्ता कराचा लक्ष्यांक पूर्ण केला जाईल, असे मालमत्ता कर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावरील कारवाईस होतेय दिरंगाई ; ठाणे काँग्रेसचे पालिका आणि पोलीस आयुक्तांना स्मरणपत्र

ठाणे पालिकेची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आणि विकास कामांच्या बाबतीत प्रशासन आघाडीवर आहे. तरीही पालिका निवडणुकीच्यावेळी शिंदे पिता-पुत्रांना येथे आपली हुकमत कायम ठेवण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांना आक्रमकपणे तोंड देण्यासाठी रखडलेली, राहिलेली कामे हाती घेण्यासाठी ठाणे पालिकेलाही वाढीव निधीची गरज आहे. ती तजवीज शासकीय निधीतून केली जाण्याची शक्यता आहे, असे सुत्राने सांगितले.

ठाणे पालिकेच्या तुलनेत कल्याण-डोंबिवली पालिका विकास कामे, आर्थिक परिस्थितीबाबत एकदमच गलितगात्र आहे. शहरात सुरू असलेली संथगती काँक्रीट रस्ते कामे, विकास कामांच्या नावाखाली शहरात पडलेला पेर. यामुळे होणारी वाहन कोंडी नागरिक प्रचंड संतप्त आहेत. नागरिकांच्या मनातील हा राग पुण्यातील कसब्याप्रमाणे बाहेर पडला तर मोठा धक्का येथे बसू शकतो. हा पुढचा विचार करुन कल्याण डोंबिवली पालिकेच्या अर्थसंकल्पाला शासकीय निधीचा टेकू देऊन तो अर्थसज्ज विकासाभिमुख करण्याचा प्रयत्न शासन, पालिका पातळीवरुन केला जात असल्याचे समजते. अर्थसंकल्प सादर का केला जात नाही याविषयी प्रशासकीय पातळीवर कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. लवकरच अर्थसंकल्प सादर होईल, एवढेच साचेबध्द उत्तर दोन्ही पालिकेच्या वरिष्ठांकडून दिले जाते.