ठाणे : राज्यातील अनेक लोककलावंत, नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक उपक्रम आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच राज्य सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या
जीवनकार्यावर आधारित “युगप्रवर्तक – डॉ. हेडगेवार ” या नाटकाच्या केवळ सहा प्रयोगांसाठी तब्बल ४५ लाख रुपयांच्या खर्चास आर्थिक मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक प्रयोगासाठी ७ लाख ५० हजार रुपये इतका खर्च मंजूर करण्यात आला असून, या निर्णयामुळे राज्याच्या सांस्कृतिक निधीच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २ जुलै रोजी हा निर्णय जाहीर केला आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रमुख उद्दिष्ट राज्यातील कला, साहित्य, नाट्य, लोककला, संगीत, सांस्कृतिक परंपरा आणि वारसा यांचे जतन, संवर्धन व प्रसार करणे हे आहे. राज्यभरातील कलाकार, नाट्यसंस्था, लोककला मंडळे, सांस्कृतिक उपक्रम, महोत्सव आणि विविध कलाप्रकारांना आर्थिक पाठबळ देणे, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे तसेच सांस्कृतिक वैविध्य जपणे ही या विभागाची प्रमुख जबाबदारी मानली जाते. अशा विभागाकडून राज्यातील विविध कलाप्रवाहांना समान संधी आणि आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते.
असे असतानाचा आता राज्याच्या या विभागाकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित “युगप्रवर्तक – डॉ. हेडगेवार ” या नाटकाच्या केवळ सहा प्रयोगांसाठी तब्बल ४५ लाख रुपयांच्या खर्चास आर्थिक मंजुरी दिली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २ जुलै रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, भोईसर, कोल्हापूर, जळगाव, लातूर, वर्धा आणि वाशीम या सहा ठिकाणी या नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रत्येक प्रयोगासाठी साडेसात लाख रुपये, अशा एकूण ४५ लाख रुपयांच्या निधीस वित्तीय मंजुरी देण्यात आली असून, हा खर्च राज्याच्या कला व संस्कृती विभागाच्या अर्थसंकल्पातून करण्यात येणार आहे.
शासनाने या निर्णयामागे डॉ. हेडगेवार यांच्या जीवनकार्याचा परिचय युवकांना करून देणे, राष्ट्रनिष्ठा, संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा उद्देश असल्याचे नमूद केले आहे. मात्र, या निर्णयाची वेळ आणि त्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद यावरून विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील अनेक प्रायोगिक नाट्यसंस्था, लोककला मंडळे, ग्रामीण कलाकार आणि सांस्कृतिक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानासाठी शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. अनेकांना नियमित अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना, केवळ सहा प्रयोगांसाठी तब्बल ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर होणे हे सांस्कृतिक क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका नाट्यप्रयोगामागे साडेसात लाख रुपये खर्च करण्यामागील निकष काय, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
यापूर्वीही राज्य सरकारवर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विशिष्ट विचारसरणीला चालना दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यात आता या नव्या निर्णयाची भर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीचा निधी हा सर्व प्रवाहांतील कलाकार आणि संस्थांसाठी समानपणे वापरला जाण्याऐवजी, विशिष्ट व्यक्तिमत्त्वावर आधारित नाट्यप्रयोगांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्याची टीकाही काही सांस्कृतिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. दरम्यान, या खर्चाची रक्कम राज्याच्या राज्य कला-संस्कृती जतन, संवर्धन व विविध महोत्सव या लेखाशीर्षाखालील निधीतून करण्यात येणार असून, कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.
इतर युगप्रवर्तकांचे काय ?
राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून प्रामुख्याने महापुरुषांच्या जीवनावर आधारित नाटक, संगीत, साहित्य यांसारख्या बाबींना वाव देणे असते. तर ज्या पद्धतीने राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून डॉ. हेडगेवारांच्या नाटकासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे त्याच पद्धतीने लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसह इतर ही जुन्या लोककलावंतांच्या बाबतीत अशीच तरतूद करण्यात येणार का असा सवाल उपस्थित होतो आहे.
