ठाणे - शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात याव्या. विविध पिकांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनातर्फे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. ठाणे जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांशी गुरुवारी संवाद साधून त्यांच्या शेतीला भेट येऊन या उपक्रमाची सुरुवात केली. समस्यांमुळे शेतकरी अनेकदा टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा पर्याय निवडतात. पारंपरिक शेतीबरोबरच सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. हेही वाचा >>>कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा पहाटे पाच वाजल्यापासूनच मेळघाटात दौरा सुरू याबाबतचे शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही . त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या जमिनीत विविध पिकांचे प्रयोग करण्यासाठी धजावतात. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपायोजना राबविण्यासाठी राज्य शासनातर्फे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा प्रशासनातील कृषी विभागाचे अधिकारी महिन्यातील तीन दिवस शेतकऱ्यांच्या भेटीला त्यांच्या गावात जाणार आहेत. तर महसूल विभागातील अधिकारी महिन्यातील एक दिवस त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. या बैठकांदरम्यान शेतकऱ्यांच्या समस्यां जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत पारंपरिक पिकांबरोबरच इतर पिके घेतली आहेत, त्यांच्या भेटीलाही अधिकारी जाणार आहेत. हेही वाचा >>>अमरावती : …तर कृषी धोरणातही बदल करणार; कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची मेळघाटात ग्वाही यात प्रामुख्याने दुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या भेटीला प्राधान्य दिले जाणार आहे. या भेटींदरम्यान शेतकऱ्यांकडून केली जाणारी नांगरणी, पेरणी, छाटणी याबाबतची तसेच प्रत्येक गावातील पीक पद्धतीची, पाणी व्यवस्थेची माहिती अधिकारी वर्ग संकलित करणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनांच्या वतीने अनेक उपायोजना राबविण्यात येत असतात. या उपयोजनांची अंमलबजावणी आणि लाभ घेताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी याबाबतही अधिकारी माहिती संकलित करणार आहेत. हा माहिती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसमोर समोर सादर केला जाणार आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत राज्य शासनाकडून विविध उपायोजना राबविण्यात येणार आहेत. ठाणे जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट येऊन त्यांच्याशी संवाद साधून गुरुवारी या उपक्रमाची सुरुवात केली. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच भिवंडी येथील काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या मोगऱ्याच्या शेतीला अधिकारी वर्गाने भेट दिली. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.