कल्याण - ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या पडझड झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या बस आगारांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या दोन्ही एस. टी. बस आगारांच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने १३ कोटी ३८ लाख ८१ हजार ८४८ रूपयांची तरतूद केली आहे. शहापूर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी तीन कोटी ६९ लाख ६२ हजार ७१६ रूपये, मुरबाड बस आगारासाठी नऊ कोटी ६९ लाख १९ हजार १३२ रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कुर्ला येथील कार्यकारी अभियंत्यांनी या बस आगारांच्या पुनर्बांधणीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मागील ३५ ते ४० वर्षापूर्वी शहापूर आणि मुरबाड एस. टी. बस आगारांची नव्याने उभारणी करण्यात आली होती. दरम्याच्या काळात या आगारांची किरकोळ दुरुस्ती करण्यात येत होती. चाळीस वर्षापासुनच्या या दोन्ही बस आगारांच्या या दोन्ही वास्तू धोकादायक झाल्या होत्या. शहापूर बस आगाराची वास्तू गेल्या वर्षीच परिवहन महामंडळीने जमीनदोस्त केली होती. सुमारे दहा एकर जमिनीवर शहापूर बस आगाराची वास्तू उभी होती. तेवढ्याच जागेवर मुरबाड आगार उभे आहे. या आगारांमध्ये प्रवासी बस थांब्यांबरोबर लगत मोटार दुरुस्ती कार्यशाळा आहेत. दोन्ही आगारांमध्ये चालक, वाहक, इतर कर्मचारी मिळून सुमारे आठशेहून अधिक कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. हेही वाचा >>> Dombivali Robbery Cases :डोंबिवलीत सुरक्षेचे तीन तेरा, विविध प्रकरणांत तेरा लाखांचा ऐवज लंपास! ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून एस. टी. बस ओळखली जाते. गाव तेथे एस. टी. या परिवहन महामंडळाच्या उपक्रमामुळे खेड्यापाड्यांमधील मुलांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन शिक्षण घेता येते. शहापूर तालुक्यातील २८८ गाव हद्दीमध्ये एस. टी. चा संचार आहे. मुरबाड तालुक्यातील गाव, आदिवासी पाड्यांमध्ये एस.टी.नेच प्रवासी प्रवास करतात. राज्याच्या विविध आगारांमधील बस या आगारांमधून प्रवासी वाहतूक करतात. मुरबाड बस आगारातून पुणे, नगरकडे जाणाऱ्या, शहापूर आगारातून नाशिक, धुळे भागात बस सुटतात. सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी एस. टी. बसला प्राधान्य देतात. हेही वाचा >>> पत्नीने मुलाला घरी राहण्यास आणले, संतापलेल्या सावत्र वडिलांकडून साडे चार वर्षीय मुलाची हत्या, पोलिसांकडूनच गुन्हा दाखल मागील पाच ते दहा वर्षापासून शहापूर, मुरबाड बस आगारांच्या इमारती जुन्या झाल्याने पावसाच्या पाण्याने गळत होत्या. प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची बसण्याची गैरसोय होत होती. त्यामुळे शहापूर बस आगार गेल्या वर्षी जमीनदोस्त करण्यात आले. या आगारातील मोकळ्या जागेतून प्रवासी वाहतूक केली जाते. शहापूर, मुरबाड दोन्ही बस आगारा महामार्गांलगत मोक्याच्या भूखंडावर आहेत. या दोन्ही आगारांची परिवहन विभागाने उभारणी करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. डोंबिवलीत कस्तुरी प्लाझाच्या जागेवर राज्य परिवहन महामंडळाचा भूखंड होता. पण तत्कालीन राजकीय मंडळींनी हा भूखंड हडप करून तेथे निवासी गृहसंकुले उभी करून स्वताचे भले करून घेतले. त्यामुळे डोंबिवली परिसरातील प्रवाशांना कल्याण किंवा डोंबिवली एमआयडीसीतील जीमखाना बस आगारात जाऊन एस. टी.ने प्रवास करावा लागतो.