ठाणे: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त वयोवृद्ध कर्मचाऱ्यांचे गेले दोन महिन्यांपासून निवृत्ती वेतन (पेन्शन) रखडल्याने या सर्व कर्मचाऱ्यांनी राज्यभर बुधवारी आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद ठाणे शहरातही पाहायला मिळाले. ठाणे पूर्व येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाबाहेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भर उन्हात आंदोलन केले. निवृत्ती वेतन रखडल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तात्पुरते लेखाशीर्ष, महालेखाकार, मुंबई यांचे कार्यालयाने गोठविल्यामुळे मार्च २०२६ पासून सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्ती कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने बुधवारी राज्यातील संपूर्ण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचारी यांनी त्यांच्या विविध कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन शासनाचे निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधले.
यावेळी ‘पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची’,‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाचा निषेध असो’, ‘पेन्शनसाठी कायमस्वरुपी लेखाशिर्ष झालाच पाहिजे’,‘अधिकारी कर्मचारी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या. दरम्यान, ‘आज आम्हाला एक दिवस धरणे आंदोलन करावे लागले आहे परंतू, पेन्शन लवकर मिळाले नाही तर, हजारोंच्या संख्येने पेन्शनधारक आझाद मैदानावर उपोषण करतील,’ असा इशारा कृती समितीचे सदस्य सिद्धार्थ रोकडे यांनी दिला आहे.- निवृत्ती वेतनावर कर्मचारी अवलंबून...
मार्च २०२६ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांना २०२६ -२७ च्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपयांची तरतूद आहे. असे असतानाही सेवानिवृत्ती वेतन गेले दोन महिने मिळालेले नाही ही खेदाची बाब असल्याचे कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले. आज अनेक सेवानिवृत्त कर्मचारी हे निव्वळ पेन्शनवर अवलंबून असून त्यांना औषधोपचारासाठी पैसे नाही त्यामुळे ते हवालदिल झाले आहे, त्यांची प्रकृती बिघडलेली आहे अशी व्यथा देखील काही कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
