ठाणे : राज्यात २०२३ मध्ये ३,११० पादचारी व सुमारे ७,७८२ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. राज्यात दररोज सरासरी ८ ते ९ पादचारी व २१ दुचाकीस्वार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. एकूण रस्ते अपघाती मृत्यूंपैकी सुमारे २० टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे, तर जवळपास निम्मे मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामुळे एकूण अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ७० टक्के मृत्यू पादचारी व दुचाकीस्वारांचे असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘ट्रॅफिक स्कूल ऑन व्हील्स’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण-डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

देशातील रस्ते अपघातांत पादचारी व दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे २०२३ मधील आकडेवारीवरून स्पष्ट होते. देशात २०२३ मध्ये वर्षभरात ३५,२०३ पादचारी व ७७,५३९ दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला. दररोज सरासरी ९६ पादचारी व २१२ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागतो.

राज्यात २०२३मध्ये ३,११० पादचारी व सुमारे ७,७८२ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. राज्यात दररोज सरासरी ८ ते ९ पादचारी आणि २१ दुचाकीस्वार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. राज्यातील एकूण रस्ते अपघाती मृत्यूंपैकी सुमारे २० टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे, तर जवळपास निम्मे मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामुळे एकूण अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ७० टक्के मृत्यू पादचारी आणि दुचाकीस्वारांचे असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले.

रस्त्यावर वाहतुकीचा नियम मोडणे ही केवळ कायदेशीर चूक नसून, अनेकदा एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही केवळ पोलीस वा परिवहन विभागाची जबाबदारी नसून, प्रत्येक वाहनचालक, पादचारी व नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सरनाईक म्हणाले.

वाहतूक नियमांचे महत्त्व केवळ दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या व इतरांच्या जिवाच्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या मनात रुजले पाहिजे. यासाठी वाहतूकविषयक शिक्षण नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविणारा हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरेल. या फिरत्या वाहतूक शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी, वाहनचालक, व्यावसायिक चालक तसेच सामान्य नागरिकांना वाहतूक नियम, सुरक्षित वाहनचालकाचे वर्तन, हेल्मेट (शिरस्राण) व सीटबेल्टचा (आसनपट्टा) वापर, वेगमर्यादा, सिग्नल नियमांचे पालन, मार्गिका शिस्त तसेच मद्यपान करून वाहन चालविण्याचे गंभीर परिणाम याबाबत आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

‘मला काही होणार नाही’ हा आत्मविश्वास रस्त्यावर सर्वात मोठा धोका ठरू शकतो. मोबाइलवर बोलत वा संदेश पाठवत वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे या सवयी अपघातांना निमंत्रण देतात. त्यामुळे विशेषतः तरुणांनी रस्ता सुरक्षेला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.