गेल्या दोन महिन्यांपूर्वी ठाणे शहरांसह उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या शहरांतील हवा प्रदूषित असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मोजण्यात आलेल्या हवा गुणवत्ता निर्देशांकावरून समोर आले होते. तर सध्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संकेतस्थळ आणि हवा गुणवत्ता मापन करणारे काही खासगी संकेतस्थळाच्या आकडेवारी वरून ठाणे जिल्ह्याच्या हवेचा दर्जा सतत खालावत असल्याचे समोर आले आहे. मागील दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा १५० हुन अधिकच असल्याचे निदर्शनास आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाणे : नातेवाईकाकडून मुलाचा लैंगिक छळ

मुंबई तसेच नवी मुंबई शहरांच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याचे वारंवार समोर येत आहे. यामध्ये अधिकतर मुंबई शहराची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले आहे. याच पद्धतीने मागील तीन महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील ठाण्यासह, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांतील हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये शहरांतील औद्योगिक भागांबरोबरच निवासी क्षेत्रात देखील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे समोर आले होते. जिल्ह्यातील वाहनांची वाढती संख्या त्यामुळे होणारे प्रदूषण, कारखान्यांमधून निघणारे घातक असे वायू, दिवसरात्र चालणारी बांधकामे यांमुळे जिल्ह्याच्या हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे विविध शहरांमधील हवा ही गुणवत्ता निर्देशांकानुसार नागरिकांच्या श्वसनास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर हवेचा वारंवार खालावणारा हा दर्जा आता नागरिकांच्या आरोग्यसाठी घातक ठरत असून यामुळे विविध श्वसनाच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून काहीतरी ठोस उपायोजना करण्यात याव्या अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी तसेच नागरिकांडून केली जात आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत तृण धान्यांचे प्रदर्शन; शरीर सुदृढतेसाठी पौष्टिक तृणधान्ये महत्वाची; ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांची माहिती

सध्या जिल्ह्याच्या हवेचा दर्जा काय ?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण – डोंबिवली आणि आसपासच्या शहरांतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मंगळवारी तब्बल १९४ तर बुधवारी १८४ इतका होता. तर ठाणे शहराचा गुणवत्ता निर्देशांक हा मंगळवारी १७४ तर बुधवारी १९९ इतका नोंदविण्यात आला आहे. यामध्ये तीन हात नाका परिसरातील गुणवत्ता निर्देशांक हा १६१ इतका आहे. याबरोबरच एअर क्वालिटी इंडेक्स या खासगी संकेत स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा मंगळवारी १६७ इतका नोंदविण्यात आला आहे. जिह्यातील रहिवासी भागांमध्ये या पद्धतीचा हवा गुणवत्ता निर्देशांक असल्याने याचा नागरिकांच्या आरोग्य स्थितीवर परिणाम होत आहेत.

हेही वाचा >>>कल्याण-वसई राष्ट्रीय जलमार्ग: भिवंडी जवळील काल्हेर येथे पाणतळ कामासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ

एमपीसीसीबी कडून माहिती नाही
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागातर्फे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथे हवेतील गुणवत्ता निर्देशांक मोजण्याची यंत्र लावण्यात आली आहेत. तेथील माहिती घेण्याकरिता विभागाच्या अधिकाऱ्यांना सतत दोन दिवस संपर्क साधून देखील कोणत्याही प्रकराची माहिती अथवा प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

हवा निर्देशांक काय आहे ?
० ते ५० श्वसनास योग्य
५० ते १०० त्रास असलेल्यांसाठी अयोग्य
१०० ते २०० बालके, अस्थमा आणि हृदयरुग्णांसाठी घातक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra pollution control board refuses to provide information about deteriorating air quality in thane district amy
First published on: 08-02-2023 at 15:41 IST