ठाणे : मराठी भाषा रिक्षा-टॅक्सीचालकांना बोलता यावी यासंबंधी असलेल्या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असतानाच, त्यापाठोपाठ आता रिक्षाचालकांना मराठीचे धडे देण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी संवाद मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. यात रिक्षा-टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यात रोजच्या वापरातील संवाद मराठीसोबत हिंदीतही दिले असून, सेवा देताना कोणत्या प्रकारे बोलावे, कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच महिलांना ‘ताई-मावशी’, पुरुषांना ‘भाऊ-काका’ म्हणा, असा सल्लाही रिक्षा-टॅक्सी चालकांना देण्यात आला आहे.
राज्यातील रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर, ई-बाईक टॅक्सी यासारख्या व्यावसायिक चालकांना मराठीतून संवाद साधने अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयास काही रिक्षाचालक तसेच संघटनांकडून विरोध होत आहे. परंतु महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मे पासूनच कारवाई होणारच असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करतानाच, परिवहन विभागाने रिक्षाचालकांना मराठीचे धडे देण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी संवाद मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे.
परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग आणि विविध साहित्य संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला असून, मराठी भाषेचा वापर वाढवून प्रवाशांचा विश्वास जिंकण्याचा उद्देश यातून व्यक्त करण्यात आला आहे. प्रवाशांशी सौजन्याने आणि मराठी भाषेत संवाद साधत सेवा अधिक विश्वासार्ह करण्यासाठी हि संवाद मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र माझा… मराठी माझी बोली भाषा..! या भावनेतून तयार केलेल्या या उपक्रमाचा उद्देश प्रवासी आणि वाहनचालक यांच्यातील संवाद सुलभ, नम्र आणि स्पष्ट करणे हा आहे.
या मार्गदर्शकात रिक्षा-टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यात रोजच्या वापरातील संवाद मराठीसोबत हिंदीतही दिले असून, सेवा देताना कोणत्या प्रकारे बोलावे, कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांचे स्वागत कसे करावे, मीटर सुरू करण्याबाबत पारदर्शकता कशी ठेवावी, सुरक्षित वाहन चालवताना प्रवाशांना कसा विश्वास द्यावा याबाबत पुस्तिकेत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच वाहतूक कोंडीनुसार प्रवासाचा अंदाज सांगणे, गाणी लावण्यापूर्वी परवानगी घेणे, तसेच प्रवाशांच्या सूचनांनुसार दिशा आणि थांबे समजून घेणे यावरही भर देण्यात आला आहे. विशेष परिस्थितींमध्येही नम्र संवाद कसा ठेवावा, यासाठी सीएनजी भरणे, पावसाळ्यातील अडचणी किंवा प्रवास नाकारताना कारण स्पष्टपणे सांगण्याचे निर्देश या मार्गदर्शकात आहेत. सौजन्यपूर्ण संबोधनासाठी महिलांना ‘ताई, मावशी’ तर पुरुषांना ‘भाऊ, काका’ अशा शब्दांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
