डोंबिवली – महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेची सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षाच्या कालावधीसाठीची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. बिनविरोध झालेल्या या कार्यकारिणीच्या निवडणुकीत महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा म्हणून लेखिका डाॅ. प्रा. धनश्री साने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागील अनेक वर्ष नेहमीच खेळीमेळीच्या वातावरणात आणि शांततेत पार पडणारी महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेची निवडणूक परिवाराच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे यावेळी गाजली. समाज माध्यमांत याविषयी उलटसुलट चर्चा रंगली होती. साहित्य परिषदेशी संबंधित जुनीजाणती मंडळी ‘हस्तक्षेप’ प्रभावामुळे बाहेर फेकली गेल्याने डोंबिवलीतील एक जुन्या जाणत्यांचा वर्ग तीव्र नापसंती व्यक्त करत आहे.

तर, काही जुन्या जाणत्यांनी आपला साहित्य परिषदेवरील प्रभाव कमी करून नव्यांना पण संधी द्यावी, अशी साहित्य परिषदेतील काही नवोदित मंडळींची मागणी होती. परिषदेतील काही जुन्या जाणत्यांच्या कारभाराविषयी परिषदेतील काही मंडळी तीव्र नाराज होती. हे या बिनविरोध निवडीवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

नवीन कार्यकारिणी

आगामी पाच वर्षाच्या नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष- जयंत कुलकर्णी, कार्यवाह- रवींद्र फडणीस, सहकार्यवाह- आरती मुनीश्वर, कोषाध्यक्ष- सुनील जोशी, सदस्य म्हणून धनंजय साने, डाॅ. ललिता नामजोशी, डाॅ. प्रा. उज्जवला करंडे, डाॅ. प्रा. वृंदा कौजलगीकर, ज्येष्ठ पत्रकार कविता मयेकर, छायाचित्रपकार प्रदीप गोसावी, सचिन चोगले, विनय मणेरीकर यांचा समावेश आहे. अध्यक्षा डाॅ. साने या अनेक वर्ष के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका होत्या. अध्यापनाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांची घडण त्यांनी केली. काही पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे.

या बिनविरोध निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून गीता रिठाल, निवडणूक निरीक्षक म्हणून भिकू बारस्कर यांनी काम पाहिले.

तडजोड फिस्कटली

महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे अध्यक्ष पद अडीच वर्ष दीपाली काळे आणि अडीच वर्ष डाॅ. धनश्री साने यांना देण्यात यावे अशा सुरुवातीला हालचाली सुूृरू होत्या. पहिले वर्ष हे काळे यांनाच मिळावे यासाठी परिषदेमधील जुनेजाणते आग्रही होते. यावर सामंजस्याने तोडगा निघत नव्हता. अखेर बाह्य शक्तींचा प्रभाव वाढला. दीपाली काळे यांना माघार घ्यावी लागली. या सर्व बाह्य प्रभावामुळे मसाप डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी ठाणे जिल्हा प्रतिनिधी, परिषदेच्या त्रैमासिक संपादक पदाचा राजीनामा दिला. जिल्हा प्रतिनिधी पद मसापच्या यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांशी सलगी करून देशपांडे यांनी मिळवल्याचे काही सदस्यांनी सांगितले. तर देशपांडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.

डोंबिवली शहर हे खऱ्या अर्थाने साहित्य नगरी आहे. साहित्य विश्वात कार्यरत लेखक, कवी, साहित्यक, प्रकाशकांनी या शहराच्या वाटचालीत महत्वाचे योगदान दिले आहे. साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून ही वाटचाल नव्या दमाने पुन्हा सुरू होईल असा विश्वास आहे. – रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष