ठाणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष पोलीस तपास पथकाने आणखी तीन जणांना अटक केली असून हे तिघे प्रश्नपत्रिकांची छपाईचे कंत्राट देण्यात आलेल्या उत्तरप्रदेश येथील आग्रामधील छापखान्यांमधील कामगार आहेत. या तिघांनी मुख्य सुत्रधार विजेंद्र गुप्ता याला प्रश्नपत्रिका छापखान्यातून बाहेर काढून दिल्याची बाब तपासात पुढे आली आहे. या प्रकरणात छापखान्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे का, याचाही पथक तपास करीत आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या भिवंडीतील डोंगराळ भागात कोनगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत टीईटी प्रश्नपत्रिकांच्या प्रती जप्त केल्या होत्या. या पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले होते. राज्य सरकारने विशेष पोलीस तपास पथकाची स्थापना केली होती. याप्रकरणात राजीव शाव, आकाश कुमार, धीरज सिंग, सोनू सिंह, मिथुन सिंह, कपिल दहिया आणि याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार विजेंद्र गुप्ता याची पत्नी सुमनकुमारी गुप्ता अशा सातजणांना आतापर्यंत अटक करण्यात आली होती. मुख्य सुत्रधार विजेंद्र गुप्ता हा फरार असून त्याचा पथक शोध घेत आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिकांची छपाईचे कंत्राट माहिम पत्रण प्राव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचा छापखाना उत्तरप्रदेशातील आग्रा भागात आहे. येथूनच पेपरफुटल्याचा पोलिसांचा अंदाज होता आणि त्या दिशेने पोलिसांची पथके तपास करीत होती. याच तपासादरम्यान पथकाने नरेशकुमार पुरणचंद महोरे, संजयकुमार सुरेशचंद्र चंद्रा आणि बाबूलाल नारायणसिंह कुशवाहा या तिघांना अटक केली असून हे तिघे छापखान्यातील कामगार आहेत. यातील संजयला काही वर्षांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होत. तर, नरेशकुमार आणि बाबूलाल हे मात्र कंपनीत कार्यरत होते. या तिघांनी छापखान्यातून प्रश्नपत्रिका काढून विजेंद्रला प्रशपत्रिका दिल्याची बाब तपासात समोर आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तिघांच्या अटकेमुळे आरोपींचा संख्या दहा इतकी झाली आहे.