ठाणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १० आरोपींपैकी चार जणांना भिवंडी न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली.
भिवंडीतील डोंगराळी परिसरात टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका घेऊन आलेल्या राजीव शाव (४५), आकाश कुमार (३०) आणि धीरज सिंग (२८) यांना भिवंडी पोलिसांनी अटक केली होती. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याने राज्य सरकारला टीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
राजीव, आकाश आणि धीरज यांच्या अटकेनंतर तपासाचा विस्तार करत पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याची पत्नी सुमनकुमारी हिच्यासह एकूण १० जणांना अटक केली आहे. राजीव, आकाश, धीरज आणि सुमनकुमारी या चौघांची पोलीस कोठडी सोमवारी संपुष्टात आली. त्यानंतर त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती आरोपींचे वकील शैलेश गायकवाड यांनी दिली.
