ठाण्यातील कौसा परिसरात सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईत स्फोटकांचा मोठा साठा सापडला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ठाणे पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. एका गॅरेजमध्ये हा सर्व शस्त्रसाठा आढळून आला. यामध्ये ९ डिटोनेटर्स, १० किलो अमोनिअम नायट्रेट आणि क्रुड बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घातक पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी इस्माईल शेख, अब्दुल शेख आणि महेंद्र नाईक या तीन जणांना ताब्यात घेतले. सध्या पोलिसांकडून या तिघांची कसून चौकशी सुरू आहे. आज दुपारी चार वाजता पोलिसांकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून यावेळी सविस्तर माहिती देण्यात येईल.