ठाणे : रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर अपघात मुक्त प्रवास हेच भविष्यात परिवहन विभागाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे सांगत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रशासनाला त्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

राज्य मोटार परिवहन विभागाचा ८६ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या सह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव-भगिनी आणि नागरिकांना मंत्री सरनाईक यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले.

परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर ” अपघात मुक्त प्रवास ” हेच भविष्यात परिवहन विभागाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे सरनाईक म्हणाले. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे. दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात आल्याचे सांगत त्यांनी ऑनलाइन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकी विरुद्धची कठोर कारवाईचा उल्लेख केला. आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे, असे ते म्हणाले. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन सेवा उभारणी हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता सुरक्षा जनजागृती, पर्यावरणपूरक वाहने, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.