बदलापूरः स्त्री बीज विक्रीचा अवैध प्रकार बदलापुरात झाला असला तरी त्याची पाळेमुळे राज्यभर पसरलेली आहेत, असा धक्कादायक खुलासा राज्य महिला आयोग्याच्या प्रमुख रूपाली चाकणकर यांनी केला आहे. नाशिकमध्ये नोंदणी असलेले मात्र ठाण्यात सुरू झालेले एक आयव्हीएफ केंद्र या सर्व विक्री प्रकरणात सक्रीय होते, त्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशीही माहिती चाकणकर यांनी दिली.

या प्रकाराचा आढावा घेण्यासाठी रूपाली चाकणकर गुरूवारी बदलापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पोलीस, जिल्हा शल्य चिकित्सक, बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बेकायदेशीर आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्याचे आदेश दिले.

गरजू महिलांना हेरत त्यांना पैशांच अमिष दाखवून त्यांच्या शरीरात स्त्रीबीज विकसित करून ते काढून विक्री करण्याचा बेकायदेशीर खेळ स्थानिक पोलीस आणि शासकीय आरोग्य व्यवस्थेने उघडकीस आणला. त्यानंतर यातील मोठी साखळी उघडकीस येते आहे. सुरूवातीला तीन महिलांना या प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर आणखी दोघांना यात अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गुरूवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेत भेट दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक कैलास पवार आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांका दामले यांच्या उपस्थितीत घेतली.

यावेळी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची पाळेमुळे राज्यभर पसरले असल्याचे स्पष्ट केले. यातील आरोपी काही दिवसांपूर्वी बदलापुरात आले होते. नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरला तिकडे परवानगी असताना ते ठाण्यात सुरू झाले, असेही रूपाली चाकणकर यांनी सांगितले. एकच महिला आधार कार्ड बदलून ओळख बदलून प्रवास करत होती. यात कोणत्याही वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी नसलेल्या महिला इंजेक्शन देणे, औषध देणे अशा गोष्टी करत होत्या, असेही तपासात उघड झाल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले. दलाल महिलाच सर्व वैद्यकीय काम करत होत्या. हा महिलांच्या जीवाशी खेळ सुरू होता, असेही चाकणकर म्हणाल्या.

रॅकेट मुळासकट उखडून टाकणार

स्त्री बीज विक्रीचा विषय केवळ बदलापुरचा नाही. याची पाळेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात फोफावलेली. त्याची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचे यावेळी चाकणकर यांनी स्पष्ट केले. बदलापूर आणि आसपासच्या बेकायदा आयव्हीएफ, सोनोग्राफी केंद्रांवर आजपासून धाडसत्र सुरू होणार, असेही त्यांनी सांगितले.