ठाणे – गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्वच क्षेत्रांमध्ये तेजी दिसून येते. यामध्ये वाहन खरेदी, सोने खरेदी आणि बांधकाम क्षेत्रात प्रामुख्याने मोठी आर्थिक उलाढाल होते. याच पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्रात देखील तेजी दिसून आली आहे.

यंदाच्या पाडव्याच्या मुहूर्तावर महारेराने मुंबई महानगर प्रदेशातील तब्बल ६०७ गृहनिर्माण प्रकल्पांना विविध प्रकारच्या मंजुऱ्या दिल्या आहेत. यामध्ये विशेषत्वाने मुंबई उपनगर मध्ये १९६ आणि ठाणे जिल्ह्यात १८५ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. महारेरा प्राधिकरणाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत वेगाने शहरीकरण होत असलेल्या ठाणे जिल्ह्यात घरखरेदीची मागणी सातत्याने वाढत आहे. ठाणे जिल्ह्याची भौगोलिक जवळीक, उत्तम कनेक्टिव्हिटी, मेट्रो आणि पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली झपाट्याने वाढ यामुळे येथे नव्या प्रकल्पांना मोठी मागणी आहे. त्यामुळेच विकासकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सादर केले जात असून महारेराकडून त्यांची काटेकोर छाननी करून मंजुरी दिली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच प्रलंबित प्रस्तावांना मार्गी लावण्यासाठी महारेराने विशेष मोहीम राबवली. त्याचा परिणाम म्हणून ठाणे जिल्ह्यातील १८५ प्रकल्पांना नोंदणी, मुदतवाढ आणि सुधारणा अशा विविध स्तरांवर मंजुरी देण्यात आली.

विशेष म्हणजे पाडव्याच्या एक दिवस आधीच महारेराने मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव निकाली काढले. या मोहिमेत एमएमआर मधील अनेक प्रकल्पांना नोंदणीक्रमांक देण्यात आले, तर काही जुन्या प्रकल्पांना मुदतवाढ आणि आवश्यक तांत्रिक सुधारणांनाही मंजुरी देण्यात आली. यामुळे अडकलेले प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार असून घरखरेदीदारांचा विश्वास अधिक बळकट होणार आहे.

गृहनिर्माण क्षेत्रात पाडवा, दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांच्या मुहूर्तावर प्रकल्प सुरू करण्याची परंपरा असून यंदाही त्याला अपवाद ठरला नाही. ठाणे जिल्ह्यातील वाढत्या प्रकल्पसंख्येमुळे येत्या काळात या भागात घरखरेदीची गती अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. एकूणच, पाडव्याच्या पार्श्वभूमीवर महारेराने दिलेल्या मंजुऱ्यांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील गृहनिर्माण क्षेत्राला नवे बळ मिळाले असून ठाणे जिल्हा या विकासाच्या केंद्रस्थानी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील एकूण मंजूर प्रकल्पांचा विचार केला असता, मुंबई उपनगर १९६ प्रकल्पांसह पहिल्या क्रमांकावर असले तरी ठाणे जिल्हा १८५ प्रकल्पांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर रायगड (११०), पालघर (५२), मुंबई शहर (४२), रत्नागिरी (१४) आणि सिंधुदुर्ग (८) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. या आकडेवारीवरून एमएमआर मधील गृहनिर्माण क्षेत्राच्या विस्ताराचे चित्र स्पष्ट होत आहे.