Mahashivratri 2026 Thane Traffic Updates: महाशिवरात्रि रविवारी साजरी केली जाणार आहे. ठाण्यातील बाजारपेठेत कौपिनेश्वर मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्रिच्या दिवशी ठाण्यासह विविध शहरातून भाविक मोठ्याप्रमाणात दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे ठाणे पोलिसांनी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी बदल लागू केले आहेत. बाजारपेठेत वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू केली असून पर्यायी मार्गाने येथील वाहतुक वळविण्यात आली आहे.
महाशिवरात्रिच्या दिवशी हजारो भाविक ठाण्यातील प्रसिद्ध कौपिनेश्वर मंदिरात जातात. हे मंदिर ठाण्यातील जांभळीनाका बाजारपेठेजवळ आहे. रस्ते अरुंद असल्याने अनेकदा वाहनांची संख्या वाढल्यास आणि वाहतुक कोंडी झाल्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी बदल लागू केले आहेत. त्यानुसार, बाजारपेठेत वाहनांना प्रवेशबंदी असेल.
कसे आहेत वाहतुक बदल?
-जांभळीनाका येथून सुभाषपथ मार्गे मुख्य बाजारपेठ, ए-वन फर्निचर दुकानाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना जांभळीनाका येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने टाॅवर नाका मार्गे वाहतुक करतील.
-जनता फॅशन, ए-वन फर्निचर दुकान येथून जांभळीनाका येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना ए-वन फर्निचर दुकान येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने दादोजी कोंडदेव स्टेडिअम मार्गे वाहतुक करतील. हे वाहतुक बदल रविवारी पहटे ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू असतील.

