“वृत्ती, कार्यातून देशाचे हित हीच राष्ट्रभक्ती”; तुषार गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

गंभीर विषयाकडे सामान्यांचे लक्ष जाऊ नये म्हणून महापुरुषांच्या वादाचे विषय उपस्थित केले जातात, अशी टीका तुषार गांधींनी केली आहे.

tushar gandhi
तुषार गांधी यांची केंद्र सरकारवर टीका ( छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

राष्ट्रभक्तीचे रंग दाखविण्यासाठी घरावर, देशभर तिरंगा फडकवला म्हणजे राष्ट्रभक्ती सिध्द होत नाही. हा राष्ट्र भक्तीचा दंभपणा आहे. आपल्या वृत्ती आणि कार्यातून आपण देशाचे किती हित, किती नुकसान करतोय याची जाणीव ठेऊन देशसेवेत सक्रिय असणे म्हणजे राष्ट्रभक्ती आहे, असे मत व्यक्त करत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा उपक्रमावर टीका केली.

हेही वाचा- ठाणे: एसटी आगारात डिजिटल प्रार्थना फलक, आपली जबाबदारी ही डिजिटल प्रार्थना

डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी तुषार गांधी रविवारी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. एक दिवस तिरंगा फडकावयाचा, त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करायचे. आपल्या वृत्ती, कृतीत राष्ट्रभक्ती दिसली पाहिजे. सामान्यांचे अनेक प्रश्न दुर्लक्षित आहेत. या गंभीर विषयाकडे सामान्यांचे लक्ष जाऊ नये म्हणून महापुरुषांच्या वादाचे विषय उपस्थित केले जातात. आता प्रत्येकाने आपला महापुरूष वाटून घेतला आहे. प्रत्येक जण सोयीप्रमाणे महापुरुष वापरुन सामान्यांना झुलवत ठेवत आहेत. सामान्यांचे प्रश्न कायमच दुर्लक्षित राहिले आहेत. त्याकडे कधी कोणाचे दुर्लक्ष जाऊच नये म्हणून किरकोळ कारणावरुन वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत, असे गांधी म्हणाले.

हेही वाचा- शहरांच्या विकासाबरोबरच रस्ते जोडणी गरजेची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारत जोडो यात्रा ही काळाची गरज होती. यानिमित्ताने समाजात एक चांगला संदेश गेला आहे. आता या यात्रेच्या यशाचा काँग्रेस कसा व्यापक प्रमाणात उपयोग करुन घेत आहे, त्यावर या यात्रेचे यश अवलंबून आहे. या यात्रेचा राहुल गांधींना मोठा फायदा झाला, असे ते म्हणाले. अहंकार प्रदर्शित करण्यासाठी पुतळ्याचे राजकारण केले जाते. ज्यांचा पुतळा बसविला जातो, त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही. मग त्या विषयावरुन आपण का भांडतो याचा कोणीच विचार करत नाही. त्यामुळे या विषयात आपणास स्वारस्य नाही, असे गांधी म्हणाले.

हेही वाचा- ब्राम्हण उद्योजकांची डोंबिवलीत परिषद, देशातून ९०० उद्योजकांची उपस्थिती

चलनी नोटेवर गांधींची छबी महात्मा गांधीजींच्या तत्वा विरोधी आहे. त्यामुळे चलनी नोटेवर गांधीजींची छबी नसावी असे आपले मत आहे, असे गांधी म्हणाले. ‘गांधी गोडसे’ चित्रपटावरुन लक्ष विचलित करण्यासाठी ‘पठाण’ चित्रपटाचा वाद निर्माण करण्यात आला, असे तुषार गांधी यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 16:59 IST
Next Story
ठाणे स्थानकाबाहेरील बेशिस्त रिक्षाचालकांवर होणार कारवाई; ठाणे महापालिका आणि पोलीसांचा संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय
Exit mobile version