डोंबिवली – स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतीराव फुले आणि लेखिका सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या भारतामधील पहिल्या मुलींच्या शाळेचा गौरवशाली इतिहास डिजिटल पडद्यावर साकरण्यात येणार आहे. ‘जगदंब क्रिएशन्स’ निर्मित ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका २० जूनपासून ”मराठी वारसा” या युट्यूब चॅनलवर प्रसारित होत आहे. मराठी मालिका विश्वातील या पहिल्यावहिल्या अभिनव प्रयोगात डोंबिवलीची स्मिहा पाटोळे (९) हिची विद्यार्थ्यांनीच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील ३५०० हजार विद्यार्थिनींमधून तिची या मालिकेसाठी निवड करण्यात आली. या मालिकेसाठी निवड झालेल्या राज्यातील सहा विद्यार्थिनींची नावे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी समाजमाध्यमावरून जाहीर केली. स्मिहा पाटोळे ही डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिर शाळेत इयत्ता चौथीत शिकत आहे.सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेतील पहिल्या सहा विद्यार्थिनींपैकी एक असलेल्या सोनू पवार हिची ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्मिहा साकारताना दिसणार आहे.
निवड प्रक्रिया
स्मिहाला मिळालेली ही भूमिका अवघड परिस्थितीमधून मिळाली. या मालिकेतील ६ विद्यार्थिनींच्या भूमिकांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ३,५०० मुलींनी कलानिपुण, आवाज प्रात्यक्षिक परीक्षा (ऑडिशन्स) दिल्या होत्या. आपण मालिकेत, व्यासपीठावर कधी काम करू असे स्मिहाच्या मनात आले होते. अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध किंवा पूर्व प्रशिक्षण पाठीशी नसताना, केवळ स्वतःच्या उपजत कलागुणांच्या, कौशल्याच्या जोरावर स्मिहाने या सर्व स्पर्धकांवर मात करत बाजी मारली.
१२ तासांचे चित्रीकरण
नऊ वर्षांच्या स्मिहासाठी चंदेरी दुनियेचे हे क्षेत्र पूर्णपणे नवीन आहे. डोंबिवली ते गोरेगाव फिल्मसिटी असा प्रवास आणि त्यानंतर सेटवर १२ तासांचे शूटिंग, हे तिच्यासाठी आव्हानात्मक आहे. स्मिहा या आव्हानाचे कोणतेही दडपण न घेता त्याचा आनंद घेत आहे. संवादांचे पाठांतर असो वा कॅमेऱ्यासमोरील सादरीकरण, ती अगदी सहजपणे अभिनय करते.
सेटवरचा तिचा मोकळा वावर आणि दिग्दर्शकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची तिची वृत्ती यामुळे सेटवरील सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. अभिनय हे स्मिहाचे स्वप्न किंवा पॅशन नसले, तरी या निमित्ताने तिला काहीतरी नवीन शिकण्याची आणि ऐतिहासिक अनुभवाला सामोरे जाण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
लहान वयातच वक्तशीरपणा, कठोर परिश्रम आणि वेळेचे नेटके नियोजन यांसारख्या गोष्टी ती शिकत असल्याचे तिचे पालक सांगतात. महिलांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचा इतिहास जिवंत करणाऱ्या या मालिकेत पहिली विद्यार्थिनी साकारण्याचा स्मिहाचा हा प्रवास डोंबिवलीकरांसाठी आणि तिच्या शाळेसाठी अभिमानास्पद ठरला आहे. स्मिहा सोबतच कार्तिकी सोनार, सार्थकी रांजणीकर, अनघा शिंदे, गार्गी आहेर, शरण्या गायकवाड या राज्यभरातील अन्य विद्यार्थ्यांनीचीही मालिकेसाठी निवड झाली आहे.
