कल्याण : आम्हाला न विचारता घरातील जुना वीज मीटर काढून त्या जागी नवीन स्मार्ट मीटर का बसविला या रागातून अंबरनाथमध्ये एका वीज ग्राहकाने महावितरणच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. मारहाणीत जखम झाल्याने कर्मचाऱ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात महावितरण कर्मचाऱ्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दत्तू जाधव असे मारहाण करणाऱ्या वीज ग्राहकाचे नाव आहे. रतीराम सपकाळे असे मारहाण झालेल्या महावितरण जनमित्र कर्मचाऱ्याचे नाव आहे. महावितरण कडून देण्यात आलेली माहिती अशी, की महावितरणच्या अंबरनाथ पश्चिम येथील न्यू काॅलनी शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेले रतीराम सपकाळे हे फाॅरेस्ट नाका परिसरात वरिष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज देयकांची वसूली करीत होते.
या परिसरात राहणाऱ्या आरोपी दत्तू जाधव याच्या घरातील जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर यापूर्वी महावितरण कर्मचाऱ्यांकडून लावण्यात आले होते. आपल्या घरातील जुनी वीज मीटर काढताना आणि नवीन स्मार्ट मीटर लावताना आपणास का विचारले नाही याचा राग मनात धरून दत्तू जाधव याने रतीराम सपकाळे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाण करून दत्तू जाधव घटनास्थळावरून पसार झाले.
या मारहाण प्रकरणाची माहिती मिळताच शाखा अभियंता वैभव भोईर तातडीने जखमी सपकाळे यांना घेऊन अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले. तसेच जखमी सपकाळे यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सपकाळे यांना मारहाण करण्यात आल्याचे समजताच कार्यकारी अभियंता प्रविण चकोले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, उपकार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती तसेच विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जमा झाले. हल्लेखोर आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. पोलिसांनी दत्तू जाधव याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२(१), १३२,३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी दत्तू जाधव याचा शोध पोलीस घेत आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा दंडनीय अपराध आहे. गुन्हा सिद्ध झाला तर कठोर कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद कायद्यात आहे.

