ठाणे मंडळात रक्कम वसुलीसाठी विशेष मोहीम महावितरणच्या वीज बिल थकबाकीदारग्राहकांची वीज तोडल्यानंतरही अनेक जण चोरून किंवा शेजाऱ्याच्या मीटरवरून वीजपुरवठा घेऊन महावितरणच्या कारवाईला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशा थकबाकीदार ग्राहकांना शोधून त्यांच्याकडून थकीत रक्कम वसूल करणे आणि वीज चोरी तत्काळ थांबवण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत ठाणे मंडळातील २ लाख ३१ हजार थकबाकीदारांची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांच्याकडील ३७१ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महावितरणच्या भांडूप परिमंडळाने वीज थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष कडक मोहीम आखली आहे. या मोहिमेअंतर्गत थकबाकीदारांकडून थकीत रक्कम वसूल करण्याबरोबरच त्यांच्या सध्याच्या वीजपुरवठय़ावर नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणचे भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी मागील आठवडय़ामध्ये वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना ही माहिती दिली. अनेक महिन्यांचे वीज बिल थकल्यानंतर थकबाकीदार ग्राहकांची वीज कायमस्वरूपी खंडित करण्यात येते. मात्र असे वीजग्राहक महावितरणच्या डोळ्यात धूळफेक करून चोरून वीज वापर करतात. चोरून किंवा शेजाऱ्याच्या मीटरमधून वीज जोडणी घेऊन वीज वापरत महावितरणचे नुकसान करतात. ठाणे मंडळामध्ये महावितरणने आत्तापर्यंत २ लाख ३१ हजार वीजग्राहकांची वीज कायमस्वरूपी तोडली असून त्यांच्याकडे ३७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर वाशी मंडळातील १ लाख १५ हजार थकबाकीदारांकडे ३१ कोटींची थकबाकी आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे संकेत.. महावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांचा शोध घेण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांनी दिले आहे. वीज चोरी आणि शेजारच्या घरातून वीजपुरवठा कायद्याने गुन्हा असून त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे करपे यांनी सांगितले.