ठाणे : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढत असल्याच्या तक्रारींमुळे महावितरणने आता नवीन स्मार्ट मीटरच्या अचूकतेची पडताळणी करण्यासाठी २० ते २५ टक्के स्मार्ट मीटरसोबत जुने मीटर ‘चेक मीटर’ म्हणून बसवून दोन ते तीन महिने तुलनात्मक तपासणी करण्यास संमती दिली आहे. तसेच, अवाजवी बिलाच्या तक्रारी असलेल्या ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या घरीही चेक मीटर बसवून तपासणी केली जाणार आहे.
ठाणे शहरात स्मार्ट मीटर बसवण्यावरून नागरिकांच्या तक्रारी वाढत असून अशाच स्वरुपाच्या तक्रारी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी भाजपच्या खोपट कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. यावेळी नागरिकांनी वीज वापरात कोणताही बदल झालेला नसतानाही स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढत असल्याची तक्रार मांडली. तसेच जुने मीटर बदलताना ग्राहकांना विश्वासात घेतले जात नसून महावितरणच्या कंत्राटदारांकडून अरेरावी केली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला होता.
या तक्रारींवर आमदार संजय केळकर यांनी नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी महावितरणकडे पारदर्शक पद्धतीने स्मार्ट मीटरची तपासणी करण्याची मागणी केली होती. तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाला विरोध नसला तरी त्याचा फटका ग्राहकांना बसता कामा नये. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम राहू नये आणि बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता असावी, अशी भूमिका केळकर यांनी मांडली होती. महावितरणचे मुख्य अभियंता काकडे यांनी स्मार्ट मीटर आणि जुने मीटर दोन्ही वीज वापराची नोंद समान पद्धतीने करतात, त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे अधिक वीज वापर नोंदवला जात असल्याची भीती निराधार असल्याचे स्पष्ट केले.
ठाण्यातील सुमारे ७ लाख ५० हजार ग्राहकांपैकी तीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, यापुढे बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरपैकी २० ते २५ टक्के मीटरसोबत जुने मीटर बसवून दोन्ही मीटरच्या नोंदींची दोन ते तीन महिने तुलना केली जाणार आहे. या माध्यमातून स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आधीच स्मार्ट मीटर बसवलेल्या आणि अवाजवी बिलाबाबत अधिकृत तक्रार केलेल्या ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या घरीही ‘चेक मीटर’ बसवून वीज वापराची पडताळणी केली जाणार आहे.
