scorecardresearch

वीज बंदच्या ‘दवंडी’साठी महावितरणकडे निधीची वानवा

डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही आठवडय़ांमध्ये दोन वेळा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला.

वीज बंदच्या ‘दवंडी’साठी महावितरणकडे निधीची वानवा

पूर्वसूचना देण्यासाठी रिक्षाचालकांना पैसे देण्यावरून धुसफुस
डोंबिवलीत महावितरणतर्फे देखभाल- दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात येत असला की आदल्या दिवशी महावितरणतर्फे शहरात रिक्षा फिरवून वीजपुरवठा काही तास बंद राहील यासंबंधीची पूर्वसूचना रहिवाशांना देण्यात येत असे. गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा बंद आहे यासंबंधीची सूचना देण्यासाठी शहरभर फिरविण्यात येणाऱ्या रिक्षाचे भाडे मंजूर होत नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पूर्वसूचना फेरी थांबविली आहे. रिक्षाचे भाडे कुणी द्यायचे यावरून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकमत नाही. त्यामुळे वीजपुरवठा बंद असल्याची पूर्वसूचना महावितरणकडून दिली जात नसल्याच्या तक्रारी वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहेत.
डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही आठवडय़ांमध्ये दोन वेळा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. यासंबंधीची पूर्वसूचना देण्यात आली नाही. मध्यंतरी एका रिक्षाचालकाने रिक्षाद्वारे वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती शहरात दिली. त्या रिक्षाचालकाला पैसे कोणी द्यायचे यावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये धुसफुस झाल्याचे वृत्त आहे. शेवटी अन्य एका सहकाऱ्याने रिक्षाचालकाचे भाडय़ाचे पैसे अदा केले. महावितरणकडून योग्य वेळी पैसे मिळत नसल्याने रिक्षाचालक त्यांचे काम करण्यास पुढे येत नसल्याचे समजते. कार्यालयातील मजूर कर्मचाऱ्यालाही पगार देताना चालढकलपणा करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगर कार्यालयात हा गोंधळ सर्वाधिक असल्याचे वीज ग्राहकांकडून सांगण्यात येते.
डोंबिवली पश्चिमेत ३१ मार्च रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. यासंबंधी कोणतीही पूर्वसूचना शहरात देण्यात आली नव्हती. गुरुवारी सकाळी अकरा वाजता वीजपुरवठा खंडित झाला तेव्हा रहिवाशांना चार वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहील याची माहिती मिळाली. त्यामुळे रहिवाशांची तारांबळ उडाली. काही ग्राहकांनी वीज कार्यालयाशी संपर्क साधून वीज बंदची पूर्वसूचना का दिली नाही म्हणून विचारणा केली तेव्हा वर्तमानपत्रात वीजपुरवठा बंद राहणार असल्याची जाहिरात दिली होती, अशी उत्तरे कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. महावितरणकडे वीजपुरवठा बंद राहणार असेल तर पूर्वसूचना देण्याची प्रसिद्धी करण्यासाठी निधी मंजूर असतो, पण हा निधी योग्य रीतीने वापरला जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

वीजपुरवठा बंद राहणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांना देण्याची व्यवस्था आहे. रिक्षाला पैसे नाहीत म्हणून पूर्वसूचना दिली नाही, असे होत नाही. वर्तमानपत्रातून वीजपुरवठा बंद राहणार असल्याची जाहिरात देण्यात आली आहे.
– एस. आर. चौधरी, कार्यकारी अभियंता, महावितरण, डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2016 at 03:44 IST

संबंधित बातम्या