कल्याण – ठाणे जिल्हा पातळीवर आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित, तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी २८ हजार ४८८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी ९ कोटी ८४ लाख रुपयांचा भरणा केला. कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या तसेच वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी एकुण २ लाख ८१ हजार ४४४ वीज ग्राहकांना नोटीस पाठविण्यात आली होती.

त्यापैकी सुमारे २८ हजार ४८८ ग्राहक सहभागी झाले. महावितरण आणि वीज ग्राहक यांच्यात तडजोड होऊन ९ कोटी ८४ लाख रुपये इतका भरणा करण्यात आला. यात कल्याण मंडल-१ मध्ये प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १ लाख ७५ हजार रुपयांची वसुली झाली. कल्याण मंडल-२ मध्ये १३ हजार ६४५ प्रकरणांमध्ये ८ कोटी २६ लाख रुपयांच्या वसुलीने सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलात १४ हजार ७०२ प्रकरणांच्या निपटाऱ्यातून १ कोटी ४७ लाख रुपयांची वसुली होऊ शकली.

पालघर मंडल कार्यालयांतर्गत ९ लाख ९७ हजार रुपयांचा भरणा करणाऱ्या १४१ ग्राहकांची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कल्याण मंडळ-२ कार्यालय अंतर्गत १ लाख ६१ हजार ४३९ वीज ग्राहकांकडे १३४ कोटी रुपये, वसई मंडळ कार्यालय अंतर्गत १ लाख ०१ हजार ९१ वीज ग्राहकांकडे ११२ कोटी रुपये तर पालघर मंडळ कार्यालय अंतर्गत १८ हजार ५८६ वीज ग्राहकांकडे १९ कोटी रुपयांची अशी एकूण २६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

या परिमंडलांतर्गत कल्याण मंडळ-२, वसई, पालघर या मंडलातील संबधित २ लाख ८१ हजार वीज ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. नोटिस मिळाली नसेल तरीही या ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होत आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. संबंधित ग्राहकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील तालुका न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन या संधीचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले होते.

ठाणे आणि पालघर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने तसेच कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, महावितरणच्या विधी विभागाने लोक अदालत यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.