ठाणे : ठाणे महापालिकेच्या सेवेत असताना नेहमी वादात असणारे ठाणे महापालिकेचे निवृत्त साहाय्यक आयुक्त महेश आहेर याला महापालिकेतील एका महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झाली. कोल्हापूर येथील एका लाॅजमधून त्याला अटक केल्यानंतर त्याचा ताबा ठाणे पोलिसांना देण्यात आला. महेश आहेर याच्याविरोधात महापालिकेच्या सेवेत असताना अनेक आरोप झाले होते. साहाय्यक आयुक्तपदी असताना त्याच्याविरोधात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी त्याच्या शैक्षणिक पात्रतेविषयी आरोप केले होते.

आमदार संजय केळकर यांनीही त्याच्या अतिक्रमण विभागाच्या चौकशीची मागणी केली होती. आता आहेर लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकल्याने पुन्हा एकदा प्रकरणे उजेडात येत आहेत.ठाणे महापालिकेत साहाय्यक आयुक्त पदावर असताना २०२० ते २०२३ या कालावधीत घोडबंदर येथील एका गृहसंकुलातील सदनिकेत शितपेयामध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महापालिकेतील एका महिला कर्मचारीने केला. तसेच यासंदर्भाचे चित्रीकरण तयार करुन ते समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी सुद्धा आहेर यांनी दिली.

तसेच, नौपाडा येथील एका सदनिकेतही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर महेश आहेर याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही सुरु होता. परंतु फरार झालेल्या महेश आहेर याचा ठाणे पोलीस शोध घेऊ शकले नव्हते.कोल्हापूर पोलिसांकडून महेश आहेरविरोधात लाॅजवरच ‘ऑलआऊट मोहीम’ महेश आहेर हा ठाणे सोडून कोल्हापूरमधील एका लाॅजमध्ये राहत होता.

याच दरम्यान, कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ‘ऑलआऊट मोहीम’ सुरु होती. या मोहीमेत फरार आरोपी, गुन्हेगारांचा, अमली पदार्थ तस्करांचा पोलीस शोध घेतात. ३० एप्रिलला पहाटे कोल्हापूर येथील हातकणंगले भागात एका लाॅजवर पथकाने धाड टाकली असता तेथील लाॅजवर महेश आहेर आढळून आला. त्याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील मध्यवर्ती शोध कक्षाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अशोक खरात मैत्री संबंध? – महेश आहेर याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला १४ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या आहेर हा पोलिसांच्या कोठडीत आहे. नाशिक येथील भोंदू अशोक खरात याच्याकडेही पिडीत महिलेला त्याने नेले होते. . खरात हा ज्योतीषी असल्याचे आहेर यांनी पिडीतेला सांगितले होते. खरात याच्या कार्यालयात गेल्यानंतर खरातने बतावणी करत तिच्यावरून लिंबू उतरविला. तसेच तिला मोती खडा गळ्यात परिधान करण्यासाठी दिला होता. त्यामुळे अशोक खरात सोबत महेश आहेर संपर्कात कसा होता याचा देखील पोलीस तपास करत आहेत.चौकट

आहेर नेहमीच वादग्रस्त का?- ठाणे महापालिकेत साहाय्यक आयुक्तपदावर असताना आहेर याच्याविरोधात अनेक आरोप झाले. सर्वाधिक चर्चा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत झालेल्या वादातून झाली. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आहेर याला महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मारहाण केली होती. आव्हाड यांच्या मुलीविरोधात अपशब्द काढल्याचा आरोप आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता.

मारहाणीनंतर आहेर यांनी याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. आव्हाड यांनी यापूर्वीही आहेर याचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीही आहेर महापालिका सेवेत असताना त्याच्या शैक्षणिक पात्रतेवर आरोप केले होते. तर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अनधिकृत बांधकामाप्रकरणी महेश आहेर याच्याविरोधात तक्रारी येत असल्याने त्याच्या चौकशीची मागणी केली होती.